Maharashtra Rain Alert | राज्यात (Maharashtra) काही दिवस तुलनेने कमी झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या 24 तासांत अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या असून काही ठिकाणी मुसळधार पाऊसही झाला. या बदललेल्या हवामानामुळे (India Meteorological Department) ने रविवारी राज्यातील तब्बल 28 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
कोकण (Konkan), पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांतील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने हवामानात मोठा बदल झाला आहे. पुढील काही तासांत अनेक भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम :
पालघर (Palghar), ठाणे (Thane), मुंबई (Mumbai), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास मुसळधार पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागांत जोरदार सरी कोसळतील, तर इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल. याचबरोबर ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून संपूर्ण कोकणासाठी यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे (Pune), घाटमाथा परिसर, सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर (Solapur) आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उष्ण आणि दमट वातावरणापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Alert | मराठवाडा-विदर्भासह उत्तर महाराष्ट्र सतर्क :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जालना (Jalna), परभणी (Parbhani), बीड (Beed), हिंगोली (Hingoli) आणि नांदेड (Nanded) या जिल्ह्यांसाठी पुढील 72 तासांचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon) आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः नाशिकच्या घाटमाथा परिसरात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील अकोला (Akola), अमरावती (Amravati), बुलढाणा (Buldhana), नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur) आणि इतर जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.
तसेच या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात तसेच हलका, मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सून पुढील काही दिवस सक्रिय राहणार असल्याने खरीप हंगामातील शेतीच्या कामांना गती मिळणार असली तरी हवामानातील बदल लक्षात घेऊन अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान विभाग तसेच कृषी विभागाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






