Maharashtra Weather Update | जून महिना संपत आला असला तरी महाराष्ट्रात मान्सूनचा अपेक्षित जोर अद्याप दिसून आलेला नाही. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी अनेक भाग अजूनही दमदार सरींच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता :
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत सकाळी ढगाळ, दमट आणि उष्ण वातावरण अनुभवायला मिळत आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी सर्वच भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर परिणाम होत असून शेतकऱ्यांच्या नजरा आगामी पावसाकडे लागल्या आहेत.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी जोरदार सरी आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला असून या भागांतही विजांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Maharashtra Weather Update | मराठवाड्यात प्रतीक्षा, विदर्भात अमरावतीला ऑरेंज अलर्ट :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असला तरी अद्याप जोरदार पावसाची कमतरता जाणवत आहे. पाऊस कमी झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या आणि शेतीची कामे प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विदर्भात अमरावती जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अलर्ट लागू असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवावा, असा सल्ला हवामान विभागाने दिलाय.






