Vote without voter ID | महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, मुंबई वगळता राज्यातील 29 पैकी 28 महानगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धतीने मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये मतदार हा लोकशाहीचा केंद्रबिंदू असतो. मात्र, अनेक नागरिकांकडे मतदार ओळखपत्र उपलब्ध नसते किंवा काही कारणांमुळे ते हरवलेले असते. अशा मतदारांसाठी निवडणूक आयोगाने दिलेली सवलत मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. (Maharashtra municipal election 2026)
मतदार ओळखपत्र नसल्यामुळे मतदान करता येणार नाही, अशी भीती अनेकांच्या मनात असते. मात्र निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, मतदानासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे नाव अधिकृत मतदार यादीत असणे. जर मतदार यादीत नाव नोंदणीकृत असेल, तर ओळखपत्र नसतानाही मतदानाचा हक्क बजावता येतो, हे आयोगाने स्पष्ट केले आहे.
ओळखपत्र नाही, पण मतदार यादीत नाव असणे अनिवार्य :
भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, इलेक्ट्रॉनिक फोटो ओळखपत्र म्हणजेच EPIC कार्ड असणे उपयुक्त असले तरी ते बंधनकारक नाही. मतदार यादीत नाव असल्यास मतदार मतदान केंद्रावर निवडणूक स्लिपसह अन्य सरकारमान्य ओळखपत्र दाखवून मतदान करू शकतो. त्यामुळे ओळखपत्र हरवले असले तरी घाबरण्याचे कारण नाही.
मतदान केंद्रावर ओळख पटवण्यासाठी मतदार स्लिपसोबत फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. केवळ मतदार स्लिप दाखवून मतदान करता येणार नाही, ही बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ओळख पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मतदारांना मतदानाची परवानगी दिली जाते. (Maharashtra municipal election 2026)
Vote without voter ID | कोणत्या कागदपत्रांच्या आधारे करता येणार मतदान? :
मतदार ओळखपत्र उपलब्ध नसल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा जॉब कार्ड, फोटो असलेले पेन्शन कार्ड, केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले कर्मचारी ओळखपत्र, बँक किंवा पोस्ट ऑफिसने फोटोसह दिलेले पासबुक तसेच कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड या कागदपत्रांच्या आधारे मतदान करता येणार आहे. यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र मतदानासाठी पुरेसे ठरणार आहे. (Vote without voter ID)
तसेच मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे आधीच तपासून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ‘Voter Helpline’ ॲपच्या माध्यमातून मतदार यादीतील नोंद सहज तपासता येते. नाव यादीत असल्यास कोणत्याही अडचणीशिवाय मतदार लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊ शकतात.






