Maharashtra Victims l काश्मीरच्या पहलगाममध्ये (pahalgam attack) मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्य शोकमग्न झालं आहे. विशेषतः डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाल्याने स्थानिक पातळीवर तीव्र भावना व्यक्त होत असून आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच अमरावती आणि मालेगावमध्येही बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले (sanjay Lele) आणि हेमंत जोशी हे तिघे पर्यटक या भ्याड हल्ल्यात अचानक मृत्युमुखी पडले. काल त्यांच्या अंत्यसंस्कारावर शोकाकुल वातावरण पसरलेलं होतं. आज त्यांच्या मृत्यूचा निषेध करत सर्वपक्षीय नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था आणि शाळांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे. शहरातील दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापना बंद असून ठिकठिकाणी निषेध फलक झळकत आहेत.
शाळांची परीक्षा पुढे ढकलली; नागरिकांचा संताप :
डोंबिवलीतील (Dombivli) टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संस्थांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला असून, आजची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा 26 एप्रिल रोजी होईल, असे शाळा प्रशासनाने कळवले आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या अमरावती शहरात बंद आणि निषेध आंदोलन होणार आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सकाळी 10 वाजता राजकमल चौकात आंदोलन होईल. तसंच मालेगावमध्येही विविध सामाजिक संघटनांनी बंदची हाक दिली असून, नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Maharashtra Victims l मृत व जखमींची यादी :
या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये –
अतुल मोने (डोंबिवली)
संजय लेले (डोंबिवली)
हेमंत जोशी (डोंबिवली)
संतोष जगदाळे (पुणे)
कौस्तुभ गणबोटे (पुणे)
दिलीप देसले (पनवेल)
तर जखमी नागरिकांमध्ये –
एस. बालचंद्रू
सुबोध पाटील
शोबीत पटेल – यांचा समावेश आहे.








