‘या’ दिवशी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार! कोण करणार सादर?

On: February 11, 2026 2:27 PM
Maharashtra Budget 2026
---Advertisement---

Maharashtra Budget 2026 | महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक दिशेला आकार देणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होत असून 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या तारखांना अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अधिवेशनाचे वेळापत्रक आणि प्रमुख उपस्थिती :

सन 2026-27 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 23 फेब्रुवारीपासून होत असून ते 25 मार्चपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाचे नियोजन विधान परिषद सभापती राम शिंदे (Ram Shinde), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले.

या अधिवेशनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 6 मार्च रोजी सादर होणारा मुख्य अर्थसंकल्प. त्याआधी 24 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत पुरवणी मागण्या मांडणार आहेत. या संपूर्ण कालावधीत राज्याच्या विकास योजनांवर, आर्थिक धोरणांवर आणि आगामी वर्षातील खर्च-विनियोगावर सविस्तर चर्चा होणार आहे.

Maharashtra Budget 2026 | पहिल्या दिवशी श्रद्धांजली आणि सभागृह सुट्ट्या :

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कोणतेही शासकीय कामकाज होणार नाही. 23 फेब्रुवारीला राज्यपालांच्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहांमध्ये त्यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव मांडला जाईल. या प्रस्तावावर प्रत्येक पक्षाचे गटनेते आणि तीन सदस्यांना बोलण्याची संधी देण्यात येणार असून पहिल्या दिवसाचे कामकाज केवळ श्रद्धांजलीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. (Maharashtra Budget 2026)

अधिवेशनाच्या काळात काही दिवस सभागृहाचे कामकाज बंद राहणार आहे. 1 ते 3 मार्चदरम्यान होळीच्या सुट्ट्या असतील. त्यानंतर 19 मार्च (गुढीपाडवा), 20 मार्च (शुक्रवार), 21 मार्च (शनिवार) आणि 22 मार्च (रविवार) असे सलग चार दिवस सभागृहाचे कामकाज होणार नाही. या विश्रांतीनंतर 25 मार्च रोजी अधिवेशन संस्थगित करण्यात येणार आहे. नवीन उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होत असल्याने राजकीय वर्तुळात या अधिवेशनाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

News Title: Maharashtra Budget Session Begins Feb 23

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now