Municipal Election Maharashtra | राज्यातील मुंबईसह एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. काही ठिकाणी पाच वर्षांनंतर तर काही ठिकाणी त्याहून अधिक कालावधीनंतर या निवडणुका होत असल्याने राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. आज सायंकाळपर्यंतच अंतिम चित्र स्पष्ट होणार असल्याने उमेदवारीसाठी वेटिंगवर असलेले इच्छुक प्रचंड तणावात आहेत.
मुंबईसह अनेक शहरांमध्ये उमेदवारांची सकाळपासूनच धावपळ सुरू आहे. एबी फॉर्म (AB Form) मिळवण्यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी, फोनाफोनी आणि शक्तीप्रदर्शन सुरू असून युती-आघाडीच्या निर्णयामुळे काही ठिकाणी नाराजी तर काही ठिकाणी गोंधळाचं वातावरण आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत येत असताना राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे.
एबी फॉर्मची प्रतीक्षा; मुंबई, पुणे, केडीएमसीत गोंधळ :
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची आज अंतिम तारीख असून मुंबईत दुपारी 3 वाजेपर्यंत तर उर्वरित महानगरपालिकांमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मात्र अनेक इच्छुकांना अद्याप एबी फॉर्म न मिळाल्याने धाकधूक वाढली आहे. भाजपकडून मुंबईत आतापर्यंत 135 एबी फॉर्म वाटप करण्यात आले असून दोन उमेदवार अजूनही वेटिंगवर आहेत.
याच दरम्यान आमदार विद्या ठाकूर (Vidya thakur) यांना मोठा झटका बसला असून त्यांचा मुलगा आणि विद्यमान नगरसेवक दीपक ठाकूर यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणामुळे वॉर्ड बदलाचा प्रयत्न फसला असून अखेर भाजपने वॉर्ड क्रमांक 50 मधून विक्रम राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. पुण्यात शिवसेनेत रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरू होती. सुरुवातीला स्वबळाची तयारी करत 60 हून अधिक इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आले, मात्र ऐनवेळी युतीचा निर्णय झाल्याने फॉर्म माघारी घेण्यात आल्याने सेनेत नाराजी वाढली आहे. (BMC Election 2026)
केडीएमसी, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतंत्र लढतींची घोषणा :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 122 नगरसेवकांसाठी आज सकाळपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रभाग कार्यालयांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उशिरा एबी फॉर्म वाटप झाल्याने गोंधळ टाळण्यासाठी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला असून डोंबिवलीत सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. (Municipal Election Maharashtra)
चंद्रपूर महानगरपालिकेत (chandrapur mahanagarpalika) काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील युतीच्या चर्चा फिस्कटल्या असून काँग्रेस 66 पैकी 66 जागांवर निवडणूक लढवणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेना युती तुटल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. तसेच शिवसेना आमदाराच्या मुलासाठी तीन वॉर्डमध्ये अदलाबदली झाल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. आज सायंकाळपर्यंत कोण उमेदवार मैदानात उतरणार, हे स्पष्ट होणार असून त्यानंतरच निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू होणार आहे.






