Ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थींविषयी मोठी माहिती समोर आली आहे. पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थी यादीत बदल करण्यात आला असून, लाखो महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पडताळणीनंतर लाभार्थी यादीत मोठे बदल
सुरुवातीला सुमारे 80 लाख महिलांची नावे कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हा आकडा वाढून तब्बल 92 लाखांहून अधिक महिलांपर्यंत पोहोचला आहे. ई-केवायसी आणि इतर आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर या लाभार्थींना योजनेतून वगळण्यात आले असून, त्यांचा पुढील हप्ता थांबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थी यादीत मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. त्यामध्ये बीड (Beed) जिल्ह्याचा आकडा सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. या जिल्ह्यातील सुमारे 28 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ज्या महिलांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेली असतील, त्यांच्या तक्रारी स्वीकारून संबंधित प्रकरणांची चौकशी केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
अपात्र ठरण्यामागील कारणे काय?
योजना सुरू झाल्यानंतर लाभ वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने काही नवीन प्रक्रिया आणि निकष लागू केले होते. त्यानुसार लाभार्थींनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. ज्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा योजनेतील पात्रतेचे निकष पूर्ण केले नाहीत, त्यांची नावे लाभार्थी यादीतून कमी करण्यात आली आहेत.
पडताळणीदरम्यान सुमारे 12 लाख महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. तसेच 4.5 लाखांहून अधिक महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असल्यामुळे त्या अपात्र ठरल्या. याशिवाय, या योजनेचा लाभ घेण्यासाठी 14 हजार पुरुषांनीही अर्ज केल्याचे उघड झाले असून, तपासणीनंतर त्यांचे अर्जही फेटाळण्यात आले आहेत.
News Title: ladki Bahin Yojana 92 Lakh Beneficiaries Removed






