Ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात महिला व बालविकास विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
फेब्रुवारी हप्त्याच्या वितरणाला सुरुवात :
राज्यातील महायुती सरकारने (Mahayuti Government) आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. आता या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 27, 2026
सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सांगितले की, या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी देण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महिलांना आर्थिक मदत मिळणार असून या योजनेचा लाभ नियमितपणे देण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Ladki Bahin Yojana | ई-केवायसीसाठी 31 मार्च अंतिम मुदत :
दरम्यान, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही नियम आणि अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ई-केवायसी करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने त्यांना दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. या प्रक्रियेसाठी 31 मार्च 2026 पर्यंतची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana News)
ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी दुरुस्ती केलेली नाही, त्यांनी तातडीने मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास संबंधित महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना पुढेही सुरू राहणार असल्याचा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.






