Pune News | पुणे (Pune) शहर पुन्हा एकदा टोळीयुद्धाने हादरले आहे. कोंढवा (Kondhwa) परिसरातील खडी मशीन चौकात आज दुपारी एका तरुणावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चार गोळ्या झाडून कोयत्याने केले वार
मृत तरुणाचे नाव गणेश काळे (Ganesh Kale) असून, तो कुख्यात आंदेकर टोळीतील (Andekar Gang) नंबरकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागर काळे (Sagar Kale) याचा भाऊ असल्याची प्राथमिक माहिती आहे. आज दुपारी कोंढवा (Kondhwa) परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी गणेशवर प्रथम पिस्तुलातून तब्बल चार गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्यानेही सपासप वार केले.
या भीषण हल्ल्यात गणेश काळे हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) घटनास्थळी धाव घेतली असून, संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, गणेशचा भाऊ सागर काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणातील (Ayush Komkar Murder Case) आरोपी असून, त्याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यामुळे या हत्येचा संबंध टोळीयुद्धाशी किंवा जुन्या वादाशी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पुण्यात (Pune) गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गोळीबार आणि हत्येच्या सत्राने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोंढवा पोलीस (Kondhwa Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






