कोल्हापूरात मराठा समाज आक्रमक प्रशांत कोरटकरांना दिला ‘हा’ इशारा

On: February 26, 2025 12:47 PM
Kolhapur Maratha Community Demands Action on Prashant Koratkar
---Advertisement---

Prashant Koratkar | छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आम्हीच कारवाई करू, असा इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिला आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणावरून मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कोरटकरच्या वक्तव्याचा निषेध करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. (Prashant Koratkar )

कोरटकरच्या वक्तव्यावर कोल्हापुरात संताप

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर संशोधनात्मक मांडणी केली होती. यावर नागपूरच्या प्रशांत कोरटकरने सोमवारी (दि. २४) रात्री फोन करून सावंत यांना धमकी दिली. “तुम्हाला घरात घुसून मारू” असे बोलताच त्याने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे राज्यभरात शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने कोरटकरच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली. इतिहास संशोधकांवर अशा प्रकारे दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असून, कोरटकरला अटक करून त्याला धडा शिकवावा, अशी मागणी उपस्थित मराठा समाजाच्या नेत्यांनी केली.

सकल मराठा समाजाची आक्रमक भूमिका

सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक म्हणाले की, शिवरायांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. मात्र, कोरटकरसारख्या व्यक्तींनी त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करणे निषेधार्थ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आम्हीच योग्य ती कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.

हर्षल सुर्वे यांनी सांगितले की, इतिहासाबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्या विरोधात इंद्रजित सावंत सातत्याने पुराव्यानिशी सत्य मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याला उत्तर न देता त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. कोरटकरने फक्त धमकीच दिली नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाविषयी अनुद्गारही काढले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक झालेला आहे.

कोरटकरविरोधात दिलीप देसाई यांची तक्रार

सकल मराठा समाजाचे समन्वयक दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली असून, कोरटकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी जर कारवाई केली नाही, तर आम्ही न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देसाई यांनी दिला आहे.

यावेळी दिलीप देसाई, किरणसिंह चव्हाण, अमित अडसूळ, संपत चव्हाण, ओंकार कोळेकर, सागर पाटील, शिवराजसिंह गायकवाड, मुरारराव शिंदे, दिगंबर भोसले, प्रदीप हांडे आदी उपस्थित होते. (Prashant Koratkar )

News Title : Kolhapur Maratha Community Demands Action on Prashant Koratkar

 

Join WhatsApp Group

Join Now