Malhar Certificate l मटण दुकानदारांना ‘मल्हार सर्टिफिकेट’ देण्याच्या मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या निर्णयाला जोरदार विरोध होत आहे. विरोधकांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवत हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. जेजुरी देवस्थान तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही या धोरणाला विरोध दर्शवला आहे. अशा परिस्थितीत अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी या प्रकरणावर पोस्ट करत सरकारला रोखठोक सल्ला दिला आहे.
किरण माने यांची परखड प्रतिक्रिया :
अभिनेता किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये खंडोबा महाराजांचा उल्लेख करत सरकारच्या या धोरणावर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, “मल्हार… बहुजनांचा कुलस्वामी खंडोबाराया! बहुजनांवर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या घुसखोरांना नेस्तनाबूत करून या भूमीवर बळीचं राज्य आणणारा अत्यंत शूर, पराक्रमी असा पूर्वज. आमच्या काळजात त्याला वेगळं स्थान आहे. ग्रामीण महाराष्ट्रात बहुसंख्य घराघरातल्या देव्हाऱ्यात पूजला जाणारा त्याचा हा फोटो खूप काही सांगून जातो.”
तसेच, “महाराष्ट्र शासनाला आमच्या या पूर्वजाचं नाव द्यायचंच असेल तर देशासाठी पराक्रम गाजवणाऱ्या जवानाला किंवा समाजाला गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावणाऱ्या समाजसेवकाला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी वापरावे…” असेही त्यांनी नमूद केले.
Malhar Certificate l सर्टिफिकेटवरून राजकीय वातावरण तापले :
‘मल्हार सर्टिफिकेट’ धोरणावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयावरून विरोधक आणि स्थानिक जनता सरकारवर टीका करत असून, हा निर्णय हिंदू समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे.
नितेश राणे यांनी मात्र या धोरणाचे समर्थन करत सांगितले की, यामागे कोणताही धार्मिक हेतू नाही. मात्र, जेजुरी देवस्थान आणि गावकरी यावर आक्षेप घेत असल्याने याचा पुढे काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








