Khed Nagar Parishad Result | महाराष्ट्रात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरत आहेत. कोकणात सिंधुदुर्गपाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मालवण, कणकवलीनंतर आता रत्नागिरीतील खेड नगरपरिषदेचा निकाल समोर येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड नगरपरिषदेत इतिहास घडवत सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवला आहे.
2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर खेडमध्ये सत्तेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मतमोजणी सुरू होताच महायुतीने एकतर्फी आघाडी घेत विरोधकांना नामोहरम केले. निकाल जाहीर होताच खेड नगरपरिषदेत 21-0 असा ऐतिहासिक निकाल लागला आणि महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही. हा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता कोकणातील सत्तासमीकरणे बदलणारा मानला जात आहे.
योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय :
खेड नगरपरिषद निवडणुकीत गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी आपली संघटनात्मक ताकद आणि नेतृत्वक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. योगेश कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र असून, उदय सामंत यांच्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत फळी त्यांनी उभी केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे 17 उमेदवार विजयी झाले असून भाजपचे 3 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. महायुतीच्या या एकसंध विजयामुळे खेड नगरपरिषदेत निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली आहे. (Khed Nagar Parishad Result)
या निकालानंतर माधवी भुटाला या खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून विराजमान होणार आहेत. मतदारांनी दिलेल्या स्पष्ट कौलातून विकासाभिमुख आणि स्थिर नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित झाला आहे. 21 पैकी 21 जागा जिंकण्याची कामगिरी खेडच्या राजकीय इतिहासात मैलाचा दगड ठरणारी ठरली आहे.
Khed Nagar Parishad Result | नाशिकमध्येही शिंदे गटाचा दबदबा, महाविकास आघाडीचा सुपडासाफ :
दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातूनही महायुतीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील 11 नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल हाती आले असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली आहे. 11 पैकी तब्बल 5 ठिकाणी शिंदे गटाच्या नगराध्यक्षांचा विजय झाला आहे. भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 3 नगराध्यक्षपदाच्या जागांवर समाधान मानावे लागले आहे. (Khed Nagar Parishad Result)
नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्षपदाची जागा जिंकता न आल्याने त्यांचा पूर्णपणे सुपडासाफ झाला आहे. कोकण ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत मिळालेल्या या यशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ताकद अधिक मजबूत झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.






