IPL 2026 | आयपीएल 2026 मधील प्लेऑफची लढत आता अधिक रंगतदार झाली असून आज सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. न्यू चंदीगड (New Chandigarh) येथील मुल्लांपुर स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यात पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार असल्याने दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत.
हैदराबादची दमदार पुनरागमन :
पॅट कमिन्स (Pat Cummins) यांच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी केली नव्हती. मात्र स्पर्धेच्या उत्तरार्धात त्यांनी शानदार पुनरागमन करत शेवटच्या सात सामन्यांपैकी पाच सामने जिंकले. या सलग विजयांमुळे संघाचा आत्मविश्वास उंचावलेला दिसत आहे. विशेष म्हणजे लीग फेरीत राजस्थान रॉयल्सला त्यांनी दोन वेळा पराभूत केले होते. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी हैदराबादकडे मानसिक आघाडी असल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग (Riyan Parag) याने संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी अखेरपर्यंत वाट पाहण्याची गरज नव्हती, असे स्पष्ट केले. तरीही संघाने बाद फेरी गाठल्याने आता नव्या जोमाने ते मैदानात उतरणार आहेत. राजस्थानकडे 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यांसारखे प्रभावी खेळाडू असल्याने हैदराबादसमोर मोठे आव्हान असणार आहे.
IPL 2026 | खेळपट्टीचा अंदाज काय सांगतो? :
हा सामना महाराजा यादवेंद्र सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम (Maharaja Yadavindra Singh International Cricket Stadium), मुल्लांपुर येथे पार पडणार आहे. या मैदानाची खेळपट्टी विशेष प्रकारे तयार करण्यात आली असून पारंपारिक मातीपेक्षा येथे वाळूचा अधिक वापर करण्यात आला आहे. त्यामुळे चेंडूला अतिरिक्त उसळी मिळते आणि वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळण्याची शक्यता अधिक असते.
तसेच ही विकेट पूर्णपणे गोलंदाजांसाठीच अनुकूल नाही. सुरुवातीला संयमाने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना मोठी धावसंख्या उभारण्याची संधी येथे मिळू शकते. दोन्ही संघांमध्ये ट्रेव्हिस हेड (Travis Head), ईशान किशन (Ishan Kishan), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) यांसारखे स्फोटक फलंदाज असल्यामुळे प्रेक्षकांना आज चुरशीचा आणि रोमांचक सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.






