IPL 2025 l आयपीएल 2025 स्पर्धेच्या अवघ्या दोन आठवड्यांत खेळाडूंनी नियमांचा भंग केल्याने पंचांपासून ते आयोजकांपर्यंत खळबळ उडाली आहे. आतापर्यंत १९ सामने पार पडले असतानाच पाच प्रमुख खेळाडूंना विविध कारणांनी दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापैकी एका खेळाडूला दोन वेळा शिक्षा झाली असून, त्याच्या खात्यात तीन डिमेरिट पॉइंट जमा झाले आहेत.
स्पर्धेची तीव्रता वाढताना दिसत असली, तरी खेळाच्या शिस्तीला गालबोट लावणाऱ्या घटनांमुळे आयपीएल प्रशासन देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहे. आयपीएलच्या उर्वरित ५४ सामने बाकी असताना, नियमांचे पालन हे संघांसाठी आणि खेळाडूंकरता अत्यावश्यक ठरत चालले आहे.
कोणत्या खेळाडूंना बसला दंड? :
हार्दिक पांड्या (मुंबई इंडियन्स) :
३० मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात संथ षटकगतीमुळे कर्णधार हार्दिक पांड्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
रियन पराग (राजस्थान रॉयल्स) :
संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणाऱ्या रियन परागला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे १२ लाखांचा दंड झाला.
ऋषभ पंत (लखनौ सुपर जायंट्स) :
मुंबई इंडियन्सविरुद्ध वेळेत २० षटके पूर्ण न केल्याने ऋषभ पंतलाही १२ लाख रुपयांचा दंड झाला.
इशांत शर्मा (गुजरात टायटन्स) :
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वादग्रस्त वर्तन केल्यामुळे इशांतला मानधनाच्या २५% इतका दंड आणि १ डिमेरिट पॉइंट मिळाला.
दिग्वेश राठी (लखनौ सुपर जायंट्स) :
दिग्वेश राठीने दोन वेळा ‘नोटबुक सेलिब्रेशन’ करून नियम तोडले. पहिल्यांदा पंजाब किंग्जविरुद्ध २५% मॅच फी आणि १ डिमेरिट पॉइंट, आणि नंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध १००% मॅच फी आणि २ डिमेरिट पॉइंट्स त्याच्या नावावर जमा झाले.
पुढचे सामने अधिक शिस्तबद्ध होणार? :
आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्याला लाखो प्रेक्षक पाहतात. त्यामुळे खेळाडूंच्या प्रत्येक कृतीवर लक्ष असते. नियमांचे उल्लंघन केल्यास आता तात्काळ कारवाई होत आहे, हे स्पष्ट झाले आहे. उर्वरित सामन्यांत खेळाडूंनी अधिक शिस्तबद्ध राहण्याची गरज आहे, अन्यथा पुढे निलंबनाची कारवाईही होऊ शकते.






