टी-२० विश्वचषकाचा थरार! आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका भिडणार; कधी, कुठे आणि किती वाजता?

On: February 22, 2026 1:01 PM
India vs South Africa
---Advertisement---

India vs South Africa | टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीतील तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (Narendra Modi International Cricket Stadium) येथे दोन्ही बलाढ्य संघ आमनेसामने येणार असून, विजयी सुरुवात करण्यासाठी दोघेही सज्ज आहेत. गेल्या विश्वचषकातील अंतिम लढतीची आठवण ताजी असतानाच हा सामना अधिकच रंगतदार ठरणार आहे.

दोन्ही संघांची कामगिरी आणि हेड टू हेड आकडेवारी :

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गट अ मध्ये चारपैकी चार सामने जिंकत अव्वल स्थान पटकावले. तर एडेन मार्कराम (Aiden Markram) यांच्या दक्षिण आफ्रिका संघानेही गट ड मध्ये चार विजयांसह पहिला क्रमांक मिळवला. त्यामुळे अपराजित दोन संघांमधील ही लढत सुपर-8 मधील सर्वात मोठी मानली जात आहे. 2024 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेकडून विजय खेचून घेतला होता, त्यामुळे त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आफ्रिका संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघ सात वेळा भिडले असून त्यापैकी पाच सामने भारताने जिंकले, तर दोन दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहेत. एकूण टी-20 सामन्यांचा विचार करता दोघांमध्ये 35 सामने झाले आहेत; त्यात भारताचे 21 आणि दक्षिण आफ्रिकेचे 13 विजय आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला. भारतात खेळल्या गेलेल्या 18 सामन्यांमध्ये भारताने आठ, दक्षिण आफ्रिकेने नऊ विजय मिळवले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

India vs South Africa | खेळपट्टीचा स्वभाव आणि हवामान अंदाज :

अहमदाबादमधील खेळपट्टी काळ्या मातीची असून ती सामान्यतः संथ आणि फिरकीपटूंना सहाय्य करणारी मानली जाते. अशा पिचवर मोठ्या धावसंख्येपेक्षा नियंत्रित फलंदाजी आणि अचूक गोलंदाजी अधिक प्रभावी ठरते. याच मैदानावर भारताने नेदरलँड्सविरुद्ध सामना खेळताना कमी धावा झाल्या होत्या. उष्णतेमुळे रात्री दवाचा फारसा परिणाम अपेक्षित नाही. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यास प्रथम गोलंदाजी करण्याचा पर्याय कर्णधार निवडू शकतो.

22 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. रात्री तापमान घटेल, मात्र आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. कोलंबोमधील पावसामुळे वाया गेलेल्या सामन्यानंतर चाहत्यांचे लक्ष आता या सामन्याकडे लागले आहे.

News title : IND vs SA Super 8 Match Preview

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now