Maharashtra Weather Update | राज्यासह देशातील हवामानात मागील काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील सात राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. थंडीची लाट, दाट धुके आणि काही भागात पावसाची शक्यता यामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
राज्यात थंडीची तीव्र लाट ओसरली असली तरी गारठा कायम आहे. सकाळच्या वेळेत कडाक्याची थंडी जाणवत असून तापमानात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरी उत्तर भारतात थंडी अधिक वाढली आहे. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली होती, तर सध्या कडाक्याची थंडी आणि वायू प्रदूषण हे दुहेरी संकट नागरिकांसमोर उभे आहे.
तापमानात मोठी घसरण, वायू प्रदूषणाचे संकट :
राज्यातील काही भागांत तापमान 5.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून धुळ्यात 5.5 अंश सेल्सिअस तापमान होते. निफाड आणि जेऊर येथे 8 अंश, तर मालेगाव, अहिल्यानगर, भंडारा, नागपूर आणि यवतमाळमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. परभणी येथे तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.
थंडी वाढत असतानाच वायू प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे. दिल्ली, मुंबई आणि पुण्यात हवा आरोग्यासाठी घातक पातळीवर पोहोचली असून नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. पालिकांकडून हवा स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अद्याप अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही. प्रदूषित हवेमुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे.
Maharashtra Weather Update | थंडीची लाट, धुके आणि पावसाचा अंदाज :
थंडीची लाट आणि दाट धुक्यामुळे देशातील अनेक भागांत दृश्यमानता कमी झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने 18 ते 20 डिसेंबरदरम्यान या राज्यांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि चंदीगढमध्ये थंडी सातत्याने वाढत असून पुढील काही दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 18 डिसेंबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज असून 19 ते 20 डिसेंबरदरम्यान पंजाबमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच 17 ते 20 डिसेंबरदरम्यान तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, लडाख आणि पुद्दुचेरी येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.






