Raju Karemore | राज्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणी वाढताना दिसत आहेत. एकीकडे मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवत मोठा दणका दिला असतानाच, दुसरीकडे पक्षाचे भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरे यांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पोलिसांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार कारेमोरे (Raju Karemore) यांना दोषी ठरवत दोन वर्षे शिस्तीत राहण्याची तंबी दिली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची सामाजिक प्रतिमा आणि वर्तणूक लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना बंद पत्रावर मुक्त केले आहे.
या निकालामुळे अजित पवार गटावर (Ajit Pawar Group) राजकीय दबाव वाढला असून, सलग दोन नेत्यांवर न्यायालयीन कारवाई झाल्याने पक्षासाठी ही बाब चिंतेची मानली जात आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेमुळे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली असतानाच, राजू कारेमोरे यांच्यावरील निर्णयामुळे विरोधकांना टीकेची संधी मिळाली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी राजकीयदृष्ट्या अडचणीच्या ठरत आहेत.
पोलिसांना शिवीगाळ प्रकरणात दोषी ठरवले :
भंडाऱ्याच्या तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे यांच्याविरोधात पोलिसांना शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा निकाल भंडारा जिल्हा सत्र न्यायालय द्वितीय श्रेणीच्या न्यायाधीश भारती काळे यांनी दिला. न्यायालयाने आमदार कारेमोरे यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 294 आणि 504 अंतर्गत दोषी ठरवले. मात्र, शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कलम 353 मधून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
न्यायालयाने निकाल देताना नमूद केले की, आमदार कारेमोरे (Raju Karemore) हे लोकप्रतिनिधी असून समाजात त्यांची वर्तणूक चांगली असल्याचे नोंदीत आले आहे. याच कारणास्तव त्यांच्यासह या प्रकरणातील चार सहआरोपींना दोन वर्षांच्या कालावधीसाठी शिस्तीत राहण्याच्या अटीवर बंद पत्रावर मुक्त करण्यात आले. पुढील दोन वर्षे कोणत्याही प्रकारचा वाद, भांडण किंवा कायद्याचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
Raju Karemore | नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? :
हा संपूर्ण प्रकार 31 डिसेंबर 2021 रोजी घडला होता. आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांचे मित्र यासीन छवारे आणि अन्य तीन जण वरठी येथून तुमसरकडे जात असताना मोहाडी-तुमसर मार्गावरील नगरपंचायत निवडणुकीच्या स्ट्रॉंग रूमजवळ काही पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. त्या वेळी मारहाण करून गाडीतून 50 लाख रुपये लुटल्याचा आरोप आमदार कारेमोरे यांनी केला होता. या घटनेनंतर संतप्त झालेल्या आमदारांनी मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी वाद घालत अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर 3 जानेवारी 2022 रोजी आमदार कारेमोरे आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्षांनंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल लागला असून, न्यायालयाने दोषी ठरवतानाच त्यांना सुधारण्याची संधी दिली आहे. मात्र, एकाच वेळी मंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम राहिल्याने अजित पवार गटासाठी ही राजकीयदृष्ट्या गंभीर बाब मानली जात आहे.






