Shekhar Suman | अभिनेता शेखर सुमन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका अत्यंत वेदनादायी घटनेबद्दल खुलासा केला आहे. लोकप्रिय अभिनेता आणि ‘मुव्हर्स अँड शेकर्स’ सारख्या शोमधून आपल्या खास शैलीने प्रेक्षकांवर छाप पाडणारे शेखर सुमन यांनी सांगितले की, त्यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले, तेव्हा तो केवळ ११ वर्षांचा होता. मुलाच्या निधनानंतर शेखर सुमन यांनी त्यांच्या घरातील देव्हाऱ्यातील सर्व मूर्ती हटवल्या होत्या.
आयुष एका गंभीर आजाराने त्रस्त होता :
कनेक्ट एफएम कॅनडाला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमन यांनी त्यांच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाबद्दल सांगितले. त्यांचा मोठा मुलगा आयुष एका गंभीर आजाराने त्रस्त होता. तो बरा व्हावा आणि काहीतरी चमत्कार घडावा यासाठी शेखर सुमन नियमितपणे देवाची प्रार्थना करत होते.
आपल्या मुलाची शारीरिक अवस्था त्यांना सहन होत नव्हती, तरीही त्यांनी व्यावसायिक बांधिलकी जपून शूटिंगला जाणे सुरू ठेवले होते. एकदा शूटिंगला निघताना त्यांच्या मुलाने त्यांचा हात पकडून, “बाबा, आज नका जाऊ, प्लीज,” असे म्हटले होते. यावर शेखर यांनी “मी लवकर परत येईन,” असे आश्वासन देत मुलाचा निरोप घेतला.
Shekhar Suman | मुलाच्या अकाली निधनामुळे शेखर सुमन पूर्णपणे खचून गेले होते :
काही दिवसांनंतर शेखर सुमन यांचा ११ वर्षांचा मुलगा आयुष यांचे निधन झाले. मुलाच्या अकाली निधनामुळे शेखर सुमन पूर्णपणे खचून गेले होते. त्यांनी आपल्या घरातील देव्हारा बंद केला आणि त्यातील सर्व मूर्ती हटवल्या.
याबद्दल बोलताना शेखर सुमन म्हणाले, “ज्या देवाने माझ्या निष्पाप मुलाला माझ्यापासून हिरावून घेतले आणि मला असह्य दुःख दिले, अशा देवावर आता माझा विश्वास राहिला नाही.” आजही त्या दुःखातून पूर्णपणे बाहेर पडलो नसल्याचे सांगताना ते भावुक झाले. ते म्हणाले, “मला आजही रोज आयुषची आठवण येते.” शेखर सुमन यांचा धाकटा मुलगा अध्ययन सुमन देखील एक अभिनेता आहे.








