Vaishnavi Hagwane | पुण्यातील (Pune) वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा खळबळ उडाली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून १६ मे रोजी वैष्णवीनं जीवन संपवले. हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणावर आता राजकीय नेत्यांप्रमाणेच मराठी कलाकारही संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) यानं सोशल मीडियावर पोस्ट करत आपला रोष व्यक्त केला आहे.
पुष्कर जोगचे आक्रमक वक्तव्य :
पुष्कर जोगने लिहिलंय की, “खूप लाज वाटते… जे काही महाराष्ट्रामध्ये घडतंय… आधी स्वारगेट प्रकरण, आता वैष्णवी… आपल्या भगिनी सुरक्षित आहेत का? एका मुलीचा बाप म्हणून भीती वाटते आता…पोस्ट टाकली की कोणीतरी ट्रोल करतंच.. पण, आता गप्प बसून चालणार नाही ना…माणुसकी आणि आपल्या समाजातील निरागस भगिनींचा प्रश्न आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या” त्याच्या या भावनिक आणि संतप्त पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
पुष्कर जोग हा मराठी इंडस्ट्रीतील असा अभिनेता आहे, जो केवळ अभिनयापुरता मर्यादित राहत नाही, तर वेळोवेळी सामाजिक प्रश्नांवरही परखड मत मांडतो. त्यामुळे तो ट्रोल्सच्या निशाण्यावरही येतो. मात्र, अशा टीकांना न घाबरता तो आपले विचार मोकळेपणाने मांडत असतो. वैष्णवी प्रकरणातही त्याने तीच ठाम भूमिका घेतली आहे. याआधीही अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देत न्यायाची मागणी केली होती.
दरम्यान, वैष्णवी हगवणे हिच्या सासरच्यांनी लग्नात भरपूर हुंडा घेतल्याचं समोर आलं आहे. ५१ तोळे सोनं, एक फॉर्च्युनर गाडी आणि इतर महागड्या वस्तू देऊनही तिचा छळ थांबला नाही. तिच्या मृतदेहावर जखमांचे चिन्ह आढळले असून पोलिसांनी याप्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील आणि पती शशांक यांना अटक केली आहे.
Title : ‘I feel scared as a father of a daughter’, famous actor anger over Vaishnavi Hagwane case






