Political Controversy | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते परिणय फुके (Parinay fuke) यांनी ‘शिवसेनेचा बाप मीच आहे’ असं वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवलं आहे. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाने तातडीने आक्रमक भूमिका घेतली असून, माफीची मागणी केली आहे. (Political Controversy)
फुके काय म्हणाले? – वाद निर्माण करणारा मजकूर :
फुके म्हणाले, “शिवसेनेचा बाप मीच आहे, कारण सगळं खापर माझ्यावर फोडलं जातं. जसं काही चांगलं झालं तर आईने केलं म्हणतात आणि काही वाईट झालं की बापावर फोडतात, तसंच हे झालं आहे. त्यामुळे आपण टीकांकडे दुर्लक्ष करून पक्ष वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.”
तसेच त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानत विधान परिषदेमध्ये दुसरी संधी दिल्याचंही स्पष्ट केलं.
Political Controversy | शिवसेना शिंदे गट आक्रमक, पत्रकार परिषदेत इशारा :
परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात फुके यांनी माफी मागावी, अन्यथा “शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला. (Political Controversy)
मात्र दुसरीकडे, शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संयम राखत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ही व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया आहे, पक्षाची अधिकृत भूमिका नाही. युतीचं सरकार आहे आणि आपण जनतेच्या सेवेसाठी काम करत आहोत, त्यामुळे वाद न वाढवता कामाची प्रसिद्धी द्या.”
राजकीय तणाव वाढण्याची शक्यता; युती सरकारमध्ये विसंवाद? :
या वादग्रस्त विधानामुळे आता राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि भाजप युती सरकारमध्ये आतून कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे.
राज्याच्या महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अशा विधानांमुळे दोन्ही पक्षांत तणाव निर्माण होऊ शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.






