HSC Exam 2026 | महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता 12 वीच्या परीक्षेसंदर्भात मोठे अपडेट देण्यात आले असून विद्यार्थ्यांना आता हॉल तिकीट वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. 10 फेब्रुवारी 2026 पासून बारावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होणार असून परीक्षा 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहेत. त्यामुळे परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने विद्यार्थ्यांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हॉल तिकिटांची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकिट उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, मंडळाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ही हॉल तिकिटे संबंधित महाविद्यालयांनी प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावीत.
हॉल तिकिटासाठी शुल्क नाही, मुख्याध्यापकांची सही अनिवार्य :
बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिटाचा प्रिंट देताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश मंडळाने दिले आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईन हॉल तिकीट डाउनलोड करून समाधान मानू नये, तर महाविद्यालयाकडून अधिकृत प्रिंट घेणे आवश्यक आहे. या हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांची सही व शिक्का असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जर एखाद्या विद्यार्थ्याच्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांची सही नसेल, तर अशा विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला जाऊ शकतो. विद्यार्थ्याचा फोटो, मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असलेले हॉल तिकीटच ग्राह्य धरले जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी याबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Board)
HSC Exam 2026 | कॉपीमुक्त परीक्षेसाठी कडक उपाययोजना :
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त घेण्यासाठी शिक्षण मंडळाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीचे 31 आणि बारावीचे तब्बल 76 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. सर्वाधिक कारवाई छत्रपती संभाजीनगर विभागातील परीक्षा केंद्रांवर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (HSC Exam 2026 News)
राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत असून भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली आहे. अनेक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे विद्यार्थ्यांवर नजर ठेवली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागांतून बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेची हॉल तिकिटेही लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.






