Hinjewadi Tempo Fire | पुण्यातील हिंजवडी फेज वनमध्ये घडलेल्या टेम्पो जळीतकांड प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही घटना अपघात नव्हे, तर नियोजनबद्ध घातपात असल्याचं स्पष्ट झालं आहे. टेम्पो चालक जनार्दन हंबर्डेकर (Janardan Hambardekar) यानेच गंभीर वैयक्तिक रागातून टेम्पोला आग लावल्याचं निष्पन्न झालं आहे. (Hinjewadi Tempo Fire)
घटनेचा तपशील: चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
19 मार्च रोजी सकाळी 8 वाजता व्योमा ग्राफिक्स (Vyoma Graphics) कंपनीचे कर्मचारी सकाळच्या शिफ्टसाठी टेम्पोने जात असताना, टेम्पोमध्ये अचानक भीषण आग लागली. यात 10 कर्मचारी सुखरूप बचावले, मात्र मागचे दार न उघडल्याने 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. आग लागल्यावर ड्रायव्हर आणि पुढच्या सीटवर बसलेले कर्मचारी तातडीनं खाली उतरले होते.
पोलीस तपासात उलगडा, स्वतः चालकाने पेटवली गाडी
पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड (Vishal Gaikwad) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जनार्दन हंबर्डेकर याने कंपनीतून केमिकल आणून ड्रायव्हर सीटखाली ठेवले होते. कापडाच्या चिंध्यांचाही वापर करून आग लावण्याची तयारी केली होती. त्यानंतर मुद्दाम टेम्पोला आग लावण्यात आली.
या प्रकरणी ड्रायव्हरवर पोलिसांनी IPC अंतर्गत खून आणि खुनाचा प्रयत्न याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपासात समोर आलं की, चालकाचा पगार न मिळाल्याने आणि इतर कामांमध्ये जुंपवल्याने, त्याचा काही सहकाऱ्यांवर वैयक्तिक राग होता. 4-5 जणांवर सूड घेण्यासाठी हा अमानुष कट रचण्यात आला. (Hinjewadi Tempo Fire)
ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण पुणे शहरात संताप व्यक्त होत आहे. मृत्यूमुखी पडलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
Title : Hinjewadi Tempo Fire Shocking Conspiracy by Driver Uncovered








