Hasan Mushrif | शिवसेना नेते आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी केलेल्या ‘हिटलर’ या उल्लेखानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार वाद पेटला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी संजय मंडलिक (sanjay mandlik) यांना थेट प्रत्युत्तर देत, “मी हिटलर नाही, तर जनतेचा सेवक आहे,” अशा शब्दांत आपली भूमिका मांडली. गेली २१ वर्षे मंत्री असतानाही कधी अहंकार दाखवला नाही, अशी ठाम प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुश्रीफ यांनी सांगितले की, राजकारणात असताना आम्हाला कधीही मस्ती किंवा सत्तेचा अहंकार चढू दिला नाही. माझ्या आणि समरजित घाटगे (samarjeet ghatge) यांच्या एकत्र येण्यामुळेच काही लोक अस्वस्थ झाले असून, त्यातूनच अशी भाषा वापरली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“तशी शिकवण आमच्या वडीलधाऱ्यांनी दिलेली नाही” :
संजय मंडलिक यांच्यावर टीका करताना हसन मुश्रीफ म्हणाले की, “प्रत्येक निवडणुकीत ज्या पद्धतीने आरोप केले जातात किंवा निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, तशी शिकवण आमच्या वडीलधाऱ्यांनी आम्हाला दिलेली नाही.” राजकारणात प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता हीच आपली खरी ओळख असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
गोकुळ दूध संघाशी संबंधित निवडणूक पराभवावर बोलताना मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा मतपेट्या उघडण्याचं आव्हान दिलं. “आजही गोकुळची मतपेटी उघडूया, कुणाला किती मते मिळाली हे स्पष्ट होईल,” असं म्हणत त्यांनी संजय मंडलिकांना डिवचलं.
Hasan Mushrif | “आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार-आमदार नव्हतं” :
हसन मुश्रीफ यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना सांगितलं की, “आमच्या मागे कुठलीही बापजाद्यांची राजकीय पुण्याई नाही. आमचे वडील ना खासदार होते, ना आमदार. मी जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या कष्टावर पुढे आलो आहे.” २१ वर्षे मंत्री असूनही कधीही अहंभाव न बाळगल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
भविष्यातील राजकारणाची भीती वाटत असल्यामुळेच काही नेते अशा प्रकारची विधाने करत असल्याचा आरोप करत, माझी आणि समरजित घाटगे यांची युती काहींना रुचलेली नाही, असंही मुश्रीफ म्हणाले.
कागल नगरपालिकेत मुश्रीफ-घाटगे आघाडीचा दणदणीत विजय :
दरम्यान, कागल नगरपालिका निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. कागल नगरपरिषदेमधील २३ पैकी २३ जागा जिंकत शिवसेना शिंदे गटाला व्हाईट वॉश देण्यात आला. नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने यांचा विजय झाला असून, मतदारांनी या आघाडीवर स्पष्ट शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे.
मात्र, मुरगुड नगरपालिकेत या आघाडीला धक्का बसला असून, येथे शिवसेना शिंदे गटाने सत्ता खेचत यश मिळवलं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर या निकालांचा मोठा परिणाम होणार असल्याचं चित्र आहे.






