‘राज्याचं गृहखातं घाशीराम कोतवाल चालवत आहे का?’; हर्षवर्धन सपकाळ फडणवीसांवर संतापले

On: February 27, 2025 3:21 PM
Harshvardhan Sapkal Attacks Devendra Fadnavis
---Advertisement---

Harshvardhan Sapkal | स्वारगेट (Swargate) एसटी बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

महिलांच्या सुरक्षेवरून सरकार अपयशी?

पुण्यात सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या अमानुष घटनेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहेत का?” असा थेट सवाल करत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, “महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, सार्वजनिक ठिकाणी दारूच्या अड्ड्यांचा सुळसुळाट झाला आहे. आरोपी खुलेआम फिरत आहेत, कायद्याचा धाक उरलेला नाही. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत.”

‘अपमान करा आणि सुरक्षा मिळवा’ योजना सुरू आहे का?

सपकाळ यांनी एसटी महामंडळ आणि गृहमंत्रालयाच्या कार्यप्रणालीवरही टीका केली. “महाराष्ट्राच्या एसटीचा ब्रीदवाक्य आहे, पण त्याला अनुसरून कोणतेही काम होत नाही. सरकार आरोपींना अटक करण्याऐवजी अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशा योजना राबवत आहे,” असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, स्वारगेट बलात्कार प्रकरणात मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatraya Gade) याने पीडित तरुणीला फसवून शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. त्याने एका नव्हे, तर दोन वेळा बलात्कार केला, अशी माहिती वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाली आहे.

पीडित तरुणी पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती आणि मंगळवारी ती फलटणला जाण्यासाठी निघाली होती. मात्र, स्वारगेट बस स्थानकातील या भयानक घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. (Harshvardhan Sapkal)

हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, महिला सुरक्षेसाठी सरकारकडून प्रभावी पावले उचलली जात नाहीत. जर अशी परिस्थिती राहिली, तर महाराष्ट्रातील जनता सरकारला धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Title :  Harshvardhan Sapkal Attacks Devendra Fadnavis

 

Join WhatsApp Group

Join Now