Govinda | बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांचे दीर्घकाळ सोबत राहिलेले सेक्रेटरी आणि जिवलग मित्र शशी प्रभू यांचे 6 मार्च 2025 रोजी निधन झाले. हृदयविकाराच्या त्रासामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रभू यांच्या जाण्याने गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. (Govinda)
गोविंदाच्या आयुष्यातील मोठी पोकळी
सध्या गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चेने माध्यमांमध्ये जोर धरला असताना, आता त्यांच्या जिवलग मित्राच्या निधनाने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शशी प्रभू हे केवळ सेक्रेटरी नव्हते तर गोविंदाच्या आयुष्यातील एक विश्वासू साथीदार होते. 1986 पासून, म्हणजेच “इल्जाम” चित्रपटाच्या काळापासून त्यांनी गोविंदासोबत काम केले होते. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच गोविंदा तातडीने प्रभू यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबाला सांत्वन केले.
गोविंदा जेव्हा प्रभू यांच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांचा एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात गोविंदा दु:खाने गहिवरून रडताना आणि डोळे पुसताना दिसत आहेत. प्रभू यांच्या निधनानंतर, बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार त्यांच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
चार दिवसांपूर्वीच झाली होती शस्त्रक्रिया
गोविंदाचे दुसरे सेक्रेटरी शशी सिन्हा यांनी प्रभू यांच्या निधनाविषयी माहिती दिली. चार दिवसांपूर्वीच हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, सकाळी अचानक बाथरूममध्ये कोसळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
गोविंदाच्या (Govinda) सेक्रेटरीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर काही लोकांना संभ्रम वाटला की, मृत्यू शशी सिन्हा यांचा झाला आहे का? मात्र, नंतर शशी सिन्हा यांनी स्वतः स्पष्ट केले की, निधन झालेली व्यक्ती शशी प्रभू आहेत. नामसाधर्म्यामुळे हा गोंधळ झाल्याचे त्यांनी सांगितले.
Title : Govinda Mourns the Loss of His Close Friend and Secretary






