Govinda and Sunita Divorce | बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा (Govinda) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण त्याचे चित्रपट नसून वैयक्तिक आयुष्य आहे. गेल्या काही दिवसांपासून, गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक बातम्या समोर येत आहेत, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जवळपास 37 वर्षांच्या त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (Govinda and Sunita Divorce)
काही दिवसांपूर्वी, सुनीता आहुजा यांनी दिलेल्या मुलाखतींमधून अनेक धक्कादायक खुलासे केले होते, ज्यामुळे गोविंदा आणि त्यांच्यातील संबंधांवर अनेक प्रश्न निर्माण झाले. सुनीता यांनी सांगितले होते की, त्या आणि गोविंदा सध्या एकत्र राहत नाही. या विधानानंतर, त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिक जोर आला.
काय म्हणाला गोविंदा?
अशात या घटस्फोटाच्या चर्चेवर स्वतः गोविंदा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदाला घटस्फोटाबद्दल प्रश्न करण्यात आला होता. त्यावर अभिनेता म्हणाला की, “सध्या व्यवसायाबद्दल बोलणं सुरु आहे. मी माझा सिनेमा तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.”,असं म्हणत गोविंदाने घटस्फोटाबद्दल बोलणं टाळलं.
याबाबत अभिनेत्याचा मॅनेजर शशी सिन्हा यांनी देखील महत्वाची माहिती दिली. शशी सिन्हा म्हणाले, ‘कुटुंबातील काही सदस्यांच्या वक्तव्यांमुळे गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्यात समस्या सुरू आहेत. सध्या गोविंदा त्याच्या सिनेमामध्ये व्यस्त आहे. त्यांचा स्वतःचा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या ज्या चर्चा रंगल्या आहे, त्यावर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.’
काही रिपोर्टनुसार, गोविंदाला घटस्फोट नकोय, तर त्याची पत्नी सुनीताला घटस्फोट हवा आहे. गोविंदा याला पत्नीसोबत असलेल्या नात्याला आणखी एक संधी द्यायची आहे पण सुनीता यांचा यासाठी पूर्णपणे नकार आहे. यामुळे गोविंदा सध्या चर्चेत आला आहे.






