“मलाही चुका करण्याचा अधिकार आहे…” टी-20 विश्वचषक विजयानंतर गौतम गंभीरचं सडेतोड उत्तर

On: March 16, 2026 3:56 PM
Gautam Gambhir
---Advertisement---

Gautam Gambhir | भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2026) जिंकून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यानी त्याच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सर्व टीकाकारांची बोलती बंद केली आहे. एका ताज्या मुलाखतीत गंभीरने आपल्या चुका मोकळेपणाने मान्य केल्या, पण त्याचवेळी ‘माणूस म्हणून मलाही चुका करण्याचा अधिकार आहे’, असे सडेतोड उत्तरही दिले आहे.

गेल्या 18 महिन्यांतील आपल्या कार्यकाळावर भाष्य करताना गौतम गंभीर म्हणाला, “मी एक माणूस आहे आणि प्रत्येकाप्रमाणे मलाही चुका करण्याचा अधिकार आहे. खेळाडू चुका करतात आणि मीसुद्धा करतो. गेल्या दीड वर्षांत माझ्याकडूनही अनेक चुका झाल्या आहेत.”

गंभीर पुढे म्हणाला, जर हेतू योग्य असेल आणि तरीही चूक झाली, तर त्याबाबत कोणतीही अडचण वाटत नाही. पण चुकीच्या हेतूने केलेल्या चुका अजिबात मान्य नाहीत. “ड्रेसिंग रूममधील प्रत्येक खेळाडूसोबत मी अत्यंत प्रामाणिक राहिलो आहे. मी सर्वांशी समोरासमोर आणि स्पष्ट बोलतो. माझ्याकडे आता जे काही 18 महिने उरले आहेत, त्यातही मी याच प्रामाणिकपणाने काम करणार आहे.”

खेळाडूंवर दाखवला अढळ विश्वास

2026 च्या या विश्वचषकादरम्यान आणि त्याआधीही गंभीरने आपल्या खेळाडूंना खंबीर साथ दिली. विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि स्पर्धेदरम्यान अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) धावांसाठी संघर्ष करत होते. मात्र, गंभीरचा त्यांच्यावरील विश्वास जराही डळमळीत झाला नाही.

“फक्त तीन-चार सामने खराब गेले म्हणून तुम्ही खेळाडूंवरील विश्वास गमावू शकत नाही. ‘फॉर्ममध्ये नसणे’ आणि ‘धावा न काढणे’ यातील फरक लोकांना समजत नाही,” असा टोला गंभीरने लगावला. त्याने इशान किशनऐवजी संजू सॅमसनला (Sanju Samson) अभिषेक शर्मासोबत सलामीला पाठवण्याचा मोठा निर्णय घेतला. गंभीरचा हा विश्वास सार्थ ठरवत संजूने या स्पर्धेत ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ (Player of the Tournament) चा किताब पटकावला.

‘REVSPORTZ’ शी बोलताना गौतम गंभीरने आपले पुढील मोठे स्वप्नही बोलून दाखवले. टी-20 विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर आता गंभीरची नजर 2028 मध्ये लॉस एंजेलिस (LA Olympics 2028) येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवर आहे. “मला ऑलिम्पिकचा भाग व्हायला नक्कीच आवडेल. ऑलिम्पिकच्या मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असेल,” अशी भावना त्यानs व्यक्त केली.

Join WhatsApp Group

Join Now