Gashmeer Mahajani l मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) नुकताच ‘फुलवंती’ या सिनेमात झळकला. या चित्रपटात त्याने महापंडित शास्त्रींची भूमिका साकारली होती. प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ची मुख्य भूमिका साकारली होती. प्रवीण तरडे यांनी सिनेमाचे लेखन केले होते तर स्नेहल तरडेने सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. सिनेमातील गश्मीरच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्याने ती भूमिका उत्कृष्टरित्या निभावली. नुकतेच गश्मीरने ‘फुलवंती’च्या यशाचे गमक सांगितले. यावेळी त्याने सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत झालेल्या काही चुकाही स्पष्टपणे सांगितल्या.
काय म्हणाला गश्मीर? :
गश्मीर महाजनीला काही दिवसांपूर्वी ला ‘फुलवंती’च्या यशाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, “मला वाटते तो सिनेमा मर्यादित प्रेक्षकांसाठीच बनवला होता. त्या प्रेक्षकांनी तो स्वीकारला. त्यामुळे सिनेमा चालला. माझ्यासाठी तो चाललेला सिनेमा आहे. आर्थिक गणिते सरळ मांडली तर मी निर्माती प्राजक्ताला प्रत्येक दिवसाचा खर्च विचारला होता. पहिल्या शेड्युलला १६ दिवसांसाठी ८ ते १० लाख खर्च आला. दरबारातील भव्य दृश्यांचा ९ दिवसांसाठीचा प्रत्येक दिवसाचा खर्च १४-१५ लाख होता. पोस्ट प्रोडक्शन ३ कोटी, प्रसिद्धी ७५ लाख. प्रदर्शनापर्यंत एकूण ४ ते सव्वा ४ कोटी बजेट झाले.”
तो पुढे म्हणाला, “पुण्यातील शनिवारवाड्यात घडलेली कथा, महापंडित आणि नाचणाऱ्या बाईमधील अव्यक्त प्रेम. यात दोघांचे कोणतेही रोमँटिक दृश्य नाहीत. म्हणजे पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, वाशी, डोंबिविली, पनवेल येथील प्रेक्षक कथेशी जास्त जोडले जाणार होते. बाबासाहेब पुरंदरे यांचीही यामागे पुण्याई आहे. त्यांनी लिहिलेली कादंबरी अनेकांनी वाचलेली होती. पण फुलवंतीच्या प्रदर्शनाचा दिवसच गंडलेला होता. नवमीला सिनेमा प्रदर्शित झाला. सण असल्याने नवमी आणि दसऱ्याला लोकांनी सिनेमा पाहायला जाण्यास नकार दिला होता. तो खरं तर आमचा पहिला वीकेंड होता. पण आपले हे प्रेक्षक नवमी-दसर्याला बाहेरच पडणार नाहीत. तरी तो माऊथ पब्लिसिटीमुळे चालला. सिनेमाची कमाई ७ कोटींच्या घरात होती. ती तेवढीच होणार होती. नवमीच्या प्रदर्शनाची चूक झाली नसती तर कदाचित ८ कोटी कमाई झाली असती. पण तरी मर्यादित प्रेक्षकांसाठी ४ कोटींत बनलेला सिनेमा ७ कोटी कमावतो तर तो यशस्वी आहे.”
“सिनेमा अॅमेझॉनवरही खूप चालला. ट्रेलरच लोकांना खूप आवडला. खरं सांगायचे तर फुलवंतीची बरीच गणिते चुकलेली होती. ११ ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित होणार होता. ४ ऑक्टोबरला ट्रेलर आला. ट्रेलर किमान १५ दिवस आधी यायला हवा होता. प्रवीणचे लेखन, सिनेमॅटोग्राफी, गाणी, शास्त्री आणि फुलवंतीचे समीकरण हे सगळ्यांना आवडले. लोकांना सिनेमा आवडला. तसे बघायला गेले तर प्रसिद्धीच्या दृष्टीने खूप गंडलेला सिनेमा आहे.
प्रसिद्धी जशी व्हायला हवी होती त्यापेक्षा ६५ टक्केच झाली. ३५ टक्के कमी पडली. अनेक गोष्टी उशिरा झाल्या. प्राजक्ताची पहिली निर्मिती त्यात तीच फुलवंती त्यामुळे तिच्यावर खूप दडपण होते. पण मला तिचा अभिमान वाटतो तिने छान पुढे नेले. प्राजक्ताची एक चूक आहे ते म्हणजे तिला वेळेचे अजिबात भान नाही. माझी प्रसिद्धीच्या वेळी अनेकदा त्यावरून तिच्यावर चिडचिड व्हायची. ती प्रत्येक ठिकाणी उशीरच लावायची. प्रसिद्धीसाठी प्रोडक्शनची गाडी असते. त्यामुळे उशीर झाला तर त्यांचा खर्च वाढतो. माझ्या चिडचिडीमुळे मग तिचे उशिरा येणे हळूहळू कमी झाले.” असे गश्मीरने सांगितले.
News Title : gashmeer-mahajani-reveals-success-secret-of-fulwanti-movie-criticizes-release-date-and-prajakta-mali-time-management








