Railway | भारताच्या रेल्वे नेटवर्कमध्ये दररोज लाखो प्रवासी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात. पण या सगळ्या रेल्वेमधून(Railway)) एक अशी खास ट्रेन आहे जी केवळ प्रवासाची सोय नाही तर मोफत जेवणाचीही सोय देते. भारतात दररोज हजारो ट्रेन धावत असल्या तरी एक खास ट्रेन आहे जी प्रवाशांना मोफत नाश्ता आणि जेवण पुरवते.
दोन धर्मस्थळांना जोडणारी विशेष ट्रेन :
सचखंड एक्स्प्रेस (Sachkhand Express) महाराष्ट्रातील नांदेड येथून पंजाबमधील अमृतसर शहरापर्यंत धावते. या ट्रेनचा प्रवास सुमारे २,००० किलोमीटरचा आहे आणि ती ३९ स्थानकांवर थांबते. या ट्रेनला खास बनवणारी गोष्ट म्हणजे ती दोन मोठ्या धार्मिक स्थळांना जोडते. नांदेडमधील श्री हजूर साहिब आणि अमृतसरमधील श्री हरमंदर साहिब गुरुद्वारा. नांदेड हे शिखांचे १०वे गुरु, गुरु गोविंद सिंह यांचे अंतिम स्थान आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक या मार्गावर प्रवास करतात.
ही ट्रेन गेल्या २९ वर्षांपासून भाविकांना मोफत जेवण पुरवते. सामान्यतः भारतीय रेल्वेमध्ये जेवणाची सोय असते, मात्र त्यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागतात. पण सचखंड एक्स्प्रेस ही अशा प्रकारची एकमेव ट्रेन आहे जिथे कुठलाही अतिरिक्त खर्च न करता जेवणाची सुविधा मिळते.
प्रवाशांसाठी लंगरची विशेष सोय
प्रवासादरम्यान दिल्ली, भोपाळ, परभणी, जालना, औरंगाबाद आणि मराठवाडा या सहा ठिकाणी लंगरची सेवा दिली जाते. प्रवाशांनी स्वतः सोबत ताट किंवा भांडी आणल्यास ते येथे मोफत जेवण घेऊ शकतात. या जेवणामध्ये कधी दाल-खिचडी, कधी छोले-भात, कधी कढी-चावल, तर कधी भाजी-भाकरी असा वेगवेगळा मेनू असतो. हे अन्न गुरुद्वाऱ्यांमधून मिळणाऱ्या दानावर आधारित असते आणि सेवाभावी लोकांच्या मदतीने वाटप केले जाते.
सचखंड एक्स्प्रेस महाराष्ट्रातील (Maharashtra Railway )नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांतून जाते. या भागातील लोकांसाठी ती केवळ प्रवासाची सुविधा नसून, ती एक श्रद्धेचा भाग आहे.






