Flipkart | आपल्या घरातील जुन्या किंवा खराब झालेल्या स्मार्टफोनचे काय करायचे, हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. याच प्रश्नावर तोडगा म्हणून, ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) एक नवी आणि वेगवान सर्व्हिस सुरू केली आहे. ‘प्रेक्सो’ (PREXO – Product Exchange Online) असे या सेवेचे नाव असून, या अंतर्गत ग्राहक आपला जुना किंवा अगदी बंद पडलेला फोनही अवघ्या ४० मिनिटांत एक्सचेंज करू शकणार आहेत.
काय आहे नवी सर्व्हिस?
ही नवीन सर्व्हिस फ्लिपकार्टच्या (Flipkart) क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘फ्लिपकार्ट मिनट्स’वर (Flipkart Minutes) उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांना नवीन स्मार्टफोन खरेदी करताना, त्याचवेळी आणि त्याच ठिकाणी आपला जुना फोन एक्सचेंज करण्याची सुविधा यातून मिळणार आहे. यासाठी ग्राहकाला नवीन फोनच्या प्रोडक्ट पेजवर जाऊन एक्सचेंजचा पर्याय निवडावा लागेल आणि आपल्या जुन्या फोनची माहिती द्यावी लागेल.
ऑर्डर प्लेस केल्यानंतर, कंपनीचा ‘विशमास्टर’ (डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह) ग्राहकाच्या घरी पोहोचून जुन्या फोनची जागेवरच तपासणी (On-the-spot diagnostic test) करेल. फोनच्या स्थितीनुसार त्याची अंतिम किंमत निश्चित केली जाईल आणि ती नवीन फोनच्या किमतीतून वजा होईल. सध्या ही सेवा दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai) आणि बंगळूरु (Bengaluru) येथील निवडक पिनकोडमध्ये सुरू करण्यात आली असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत इतर मोठ्या आणि टियर-२ शहरांमध्ये तिचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.
फ्लिपकार्ट रिकॉमर्सचे वरिष्ठ संचालकने दिली माहिती-
या जुन्या फोन्सचे काय होते, याबद्दल बोलताना फ्लिपकार्ट रिकॉमर्सचे वरिष्ठ संचालक आशुतोष चन्देल (Ashutosh Chandel) आणि फ्लिपकार्ट मिनट्सच्या उपाध्यक्ष कंचन मिश्रा (Kanchan Mishra) यांनी सांगितले की, चांगल्या स्थितीतील फोन दुरुस्त करून (Refurbish) पुन्हा विकले जातात, तर पूर्णपणे खराब झालेले फोन प्रमाणित रिसायकलर्सच्या मदतीने नष्ट केले जातात, जेणेकरून ग्राहकांच्या डेटाचा गैरवापर होणार नाही. चोरीच्या फोनची समस्या हाताळण्यासाठी कंपनी ‘आयएमईआय व्हेरिफिकेशन’ (IMEI Verification) प्रणालीवर काम करत आहे.






