Lunar Eclipse | 2026 हे वर्ष खगोलशास्त्रीय घटनांच्या दृष्टीने विशेष मानले जात आहे. या वर्षात एकूण चार ग्रहणे होणार असून त्यामध्ये दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणांचा समावेश आहे. वर्षातील पहिले ग्रहण अलीकडेच झाले असून, आता अवघ्या काही दिवसांत आणखी एक महत्त्वाची खगोलीय घटना घडणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात झालेले सूर्यग्रहण भारतातून दिसले नव्हते. मात्र मार्च महिन्यात लागणारे वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतातून स्पष्टपणे पाहता येणार असल्याने खगोलप्रेमी आणि श्रद्धाळूंसाठी ते विशेष ठरणार आहे. त्यामुळे या ग्रहणाची तारीख आणि वेळ आत्ताच नोंदवून ठेवणे आवश्यक आहे.
3 मार्च 2026 रोजी लागणार चंद्रग्रहण :
मंगळवार, 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण फाल्गुन पौर्णिमेला येत असून त्याच दिवशी होलिका दहन आणि होळी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टीने या ग्रहणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी 2:16 वाजता ग्रहणाचा उपच्छाया टप्पा सुरू होईल. मात्र भारतात चंद्रोदयानंतरच हे ग्रहण प्रत्यक्ष दिसू लागेल. त्यामुळे संध्याकाळी आकाशात चंद्र उगवल्यानंतरच नागरिकांना ग्रहणाचे दर्शन घेता येईल.
Lunar Eclipse | भारतात कधी आणि कसे दिसणार? :
हे चंद्रग्रहण खग्रास स्वरूपाचे असले तरी भारतात चंद्रोदयाच्या वेळी ते आधीच सुरू झालेले असेल. त्यामुळे देशातील बहुतांश भागात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल. मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये ग्रहण आंशिक स्वरूपात पाहता येईल, तर ईशान्य भारतातील राज्यांमध्ये ते अधिक स्पष्ट आणि प्रखर दिसण्याची शक्यता आहे. (Lunar Eclipse 2026)
संध्याकाळी अंदाजे 6:26 ते 6:47 या वेळेत भारतात ग्रहणाचे दर्शन होईल. या दरम्यान चंद्र गडद लालसर रंगाचा दिसू शकतो, म्हणूनच या प्रकाराला ‘ब्लड मून’ असेही संबोधले जाते.
सुतक काळ कधी सुरू होणार? :
हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे सुतक काळ पाळला जाणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुरू होतो. त्यानुसार 3 मार्च रोजी सकाळी 9:39 पासून सुतक काळ लागू होईल.
श्रद्धा आणि परंपरेनुसार या काळात काही धार्मिक नियम पाळले जातात. तथापि, वरील माहिती सामान्य स्त्रोतांवर आधारित असून याची स्वतंत्र पुष्टी केलेली नाही. नागरिकांनी ग्रहणाविषयी अधिकृत खगोलशास्त्रीय माहितीची नोंद घेऊनच पुढील निर्णय घ्यावेत.






