केतन अग्रवालच्या वडिलांनी राष्ट्रपतींकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी!

On: July 10, 2026 1:13 PM
Ketan Agrawal
---Advertisement---

Ketan Agrawal | केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणात न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि खटल्याचा निकाल विलंब न होता लागावा, या मागणीसाठी केतनचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना ई-मेलद्वारे भावनिक निवेदन पाठवले आहे. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी, अशी त्यांची प्रमुख मागणी असून आपल्या मुलासाठी न्याय मिळवून देण्याची आर्त विनंती त्यांनी केली आहे.

मुलाच्या न्यायासाठी वडिलांची भावनिक विनंती :

राष्ट्रपतींना पाठवलेल्या ई-मेलमध्ये विशाल अग्रवाल यांनी आपण कोणतेही उद्योगपती किंवा प्रभावशाली व्यक्ती म्हणून नव्हे, तर आपल्या मुलाला गमावलेल्या एका दुःखी वडिलांच्या भूमिकेतून हे पत्र लिहित असल्याचे स्पष्ट केले आहे. “मी फक्त माझ्या मुलासाठी न्यायाची याचना करणारा एक बाप आहे,” असे नमूद करत त्यांनी केतनच्या हत्येनंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलल्याची वेदना व्यक्त केली आहे. न्यायासाठी त्यांनी भावनिक शब्दांत राष्ट्रपतींकडे हस्तक्षेपाची विनंती केली आहे.

पत्रात त्यांनी सांगितले की, केतनच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक दिवस दुःख आणि असहायतेत जात आहे. प्रत्येक सकाळ वेदनेने सुरू होते, तर प्रत्येक रात्र “केतनला न्याय कधी मिळणार?” या एकाच प्रश्नाने संपते, असे त्यांनी नमूद केले आहे. न्यायप्रक्रियेत होणारा विलंब हा कुटुंबाच्या मानसिक वेदना आणखी वाढवत असल्याचेही त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

Ketan Agrawal | फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीची मागणी :

विशाल अग्रवाल यांनी पत्रात आणखी एक धक्कादायक बाब मांडली आहे. केतनच्या निधनानंतर अवघ्या 20 दिवसांत त्यांनी आपल्या वडिलांनाही गमावल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या मते, केतनवर आजोबांचे अत्यंत प्रेम होते आणि नातवाच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. सततच्या मानसिक तणावामुळे त्यांचा रक्तदाब कमी झाला आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यामुळे केवळ 20 दिवसांच्या कालावधीत मुलगा आणि वडील अशा दोघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

आपल्या पत्रात त्यांनी कोणतीही विशेष सवलत किंवा वेगळी वागणूक मागितलेली नसल्याचेही स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन दोषींना शक्य तितक्या लवकर कठोर शिक्षा व्हावी, हीच त्यांची एकमेव अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केतन आता परत येणार नसला तरी दोषींना कायद्याच्या प्रक्रियेतून सुटका होऊ शकते, असा संदेश समाजात जाऊ नये, असे त्यांनी अधोरेखित केले. तसेच कठोर शिक्षा झाल्यास कायद्यावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल आणि अशा गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. पत्राच्या शेवटी राष्ट्रपतींनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालावे, अशी विनंती करत “आम्ही सर्व काही गमावले आहे, आता आमच्याकडे फक्त न्यायाचीच आशा आहे,” असे भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, केतनचे प्रकरण ही केवळ एक सरकारी फाईल म्हणून न पाहता त्यामागील उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचे दुःख लक्षात घेऊन लवकर न्याय मिळावा, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.

News Title: Father Seeks Justice for Ketan Agrwal

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now