FASTag Rule Change | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने FASTag संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यामुळे आतापर्यंत वाहनचालकांना भेडसावणारा ‘KYV’ म्हणजेच Know Your Vehicle प्रक्रियेचा त्रास आता संपणार आहे. या निर्णयामुळे कार, जीप आणि व्हॅन चालकांचा वेळ, पैसा आणि मनस्ताप वाचणार आहे. (FASTag Rule Change)
महामार्गांवरील प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि त्रासमुक्त करण्याच्या दृष्टीने NHAI ने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, हा नवीन नियम 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार असून, यानंतर नवीन FASTag घेणाऱ्या वाहनधारकांना KYV प्रक्रियेतून पूर्णपणे मुक्ती मिळणार आहे. यामुळे FASTag ॲक्टिव्हेशननंतर होणारी अनावश्यक कागदपत्रांची मागणी थांबणार आहे.
नेमकं काय बदललं? KYV प्रक्रिया का बंद? :
आतापर्यंत FASTag घेतल्यानंतरही अनेक वाहनधारकांना KYV प्रक्रियेसाठी बँक किंवा एजन्सीकडून वारंवार कॉल आणि मेसेज येत होते. वाहनाची सर्व कागदपत्रे वैध असतानाही पुन्हा-पुन्हा माहिती मागवली जात होती. त्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. NHAI च्या नव्या निर्णयामुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता बंद करण्यात आली आहे.
FASTag एकदा यशस्वीपणे ॲक्टिव्ह झाला की, त्यानंतर ग्राहकांकडून पुन्हा कागदपत्रांची मागणी केली जाणार नाही. या बदलामुळे फास्टॅग वापरणे अधिक सोपे होणार असून, महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत मिळणार आहे. वाहनधारकांसाठी हा बदल मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.
FASTag Rule Change | जुन्या FASTag धारकांनाही दिलासा; बँकांवर वाढली जबाबदारी :
हा नियम केवळ नवीन FASTag धारकांसाठीच नाही, तर ज्यांच्याकडे आधीपासून FASTag आहे अशा लाखो वाहनधारकांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. आता रूटीन तपासणीसाठी वारंवार KYV करण्याची गरज उरणार नाही. केवळ काही अपवादात्मक परिस्थितीतच KYV प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती NHAI कडून देण्यात आली आहे.
नव्या नियमानुसार FASTag जारी करण्याची संपूर्ण जबाबदारी आता संबंधित बँकांवर असणार आहे. FASTag ॲक्टिव्ह करण्यापूर्वी बँकांना ‘वाहन’ (VAHAN) डेटाबेसद्वारे वाहनाची सर्व माहिती तपासावी लागणार आहे. एकदा माहितीची खात्री झाल्यानंतर FASTag ॲक्टिव्ह झाला की, ग्राहकांना पुन्हा कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही. ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेल्या FASTag साठीही हेच नियम लागू असतील.
NHAI चा हा निर्णय महामार्गावरील प्रवाशांसाठी मैलाचा दगड ठरणार असून, डिजिटल टोल प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि वापरकर्त्यांसाठी सोयीस्कर बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.






