नोकरदारांसाठी गूड न्यूज! ‘या’ दिवशी जमा होणार व्याजाचे पैसे

On: June 15, 2026 8:58 PM
EPFO
---Advertisement---

PF Interest | नोकरी करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी पीएफ खात्यांवरील व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, ही रक्कम खात्यात नेमकी कधी जमा होणार, याबाबत सदस्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सरकारी मंजुरी आणि तांत्रिक प्रक्रियेमुळे व्याज जमा होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो.

8.25 टक्के व्याजासाठी पुढची प्रक्रिया काय? :

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) 28 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीत आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवण्याची शिफारस केली होती. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये व्याजदर 8.15 टक्क्यांवरून 8.25 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता आणि त्यानंतर सलग तिसऱ्या वर्षी तोच दर कायम आहे.

सीबीटीच्या शिफारशीनंतर व्याजदराला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी मिळाल्यानंतरच ईपीएफओ देशभरातील 7 कोटींहून अधिक सक्रिय सदस्यांच्या खात्यांमध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू करते. प्रत्येक सदस्याच्या मासिक शिल्लक, जमा रक्कम, पैसे काढण्याचे व्यवहार आणि इतर तपशीलांचा आढावा घेतल्यानंतर अंतिम व्याजाची गणना केली जाते. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

PF Interest | व्याज जमा झाले की नाही, कसे तपासाल? :

मागील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये अर्थ मंत्रालयाने मे 2025 मध्ये व्याजदराला मंजुरी दिली होती. त्यानंतर जून महिन्यापासून सदस्यांच्या खात्यांमध्ये व्याज जमा होण्यास सुरुवात झाली आणि जुलैच्या सुरुवातीपर्यंत बहुतांश खात्यांमध्ये ही रक्कम दिसू लागली होती. यंदाही याच पद्धतीचे वेळापत्रक राहिल्यास येत्या काही आठवड्यांत सदस्यांच्या पासबुकमध्ये व्याजाची नोंद दिसू शकते. मात्र, याची अचूक तारीख सरकारच्या मंजुरीवर आणि ईपीएफओच्या प्रक्रियेच्या गतीवर अवलंबून असेल.

दरम्यान, पासबुकमध्ये व्याजाची नोंद उशिरा दिसल्यास सदस्यांनी घाबरण्याचे कारण नाही. व्याजाची गणना संपूर्ण आर्थिक वर्षातील मासिक शिल्लक रकमेच्या आधारे केली जाते. त्यामुळे प्रशासकीय कारणांमुळे नोंद उशिरा झाली तरी व्याजाच्या रकमेवर कोणताही परिणाम होत नाही. सदस्यांना त्यांचे खाते तपासण्यासाठी ईपीएफओचे अधिकृत पासबुक पोर्टल, उमंग (UMANG) ॲप, एसएमएस सेवा आणि मिस्ड कॉल सुविधा उपलब्ध आहेत. यूएएन (UAN) सक्रिय असल्यास घरबसल्या पीएफ खात्याची संपूर्ण माहिती सहज मिळू शकते.

News Title: EPF Interest Credit Timeline

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now