Rajya Sabha Election | महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची घोषणा करत धक्कातंत्राचा वापर केल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील अनुभवी नेते राहुल शेवाळे यांचे नाव चर्चेत असतानाही अखेर ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
शेवाळेंऐवजी वाघमारेंना संधी :
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून सात सदस्य निवडले जाणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे सहा उमेदवार निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर महाविकास आघाडीकडून एक उमेदवार निवडून येऊ शकतो. यापूर्वी रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना पुन्हा एकदा संधी देत भाजपने आपल्या चार उमेदवारांची घोषणा केली होती. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे.
दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत उत्सुकता होती. अनेक राजकीय चर्चांमध्ये राहुल शेवाळे यांचे नाव पुढे येत होते. मात्र अखेर ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी निर्णय बदलत ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी संधी दिली.
Rajya Sabha Election | ज्योती वाघमारेंची निवड ठरली धक्का :
मुंबईतील अनुभवी नेते म्हणून राहुल शेवाळे यांची ओळख आहे. त्यांनी नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष तसेच खासदार अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव अनिल देसाई यांनी केला होता.
२०२२ मध्ये शिवसेना पक्षात फूट पडल्यावर राहुल शेवाळे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यामुळे ते शिंदेंचे विश्वासू मानले जातात. अशा परिस्थितीत त्यांच्या ऐवजी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे.
महाराष्ट्रातील सात सदस्यांची मुदत संपणार :
महाराष्ट्रातून सध्या राज्यसभेवर असलेल्या काही सदस्यांची मुदत लवकरच संपणार आहे. त्यामध्ये भागवत कराड, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. या सर्वांची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपणार आहे.
त्यामुळे भारत निवडणूक आयोग यांनी या सात जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज, मतदान आणि निकाल या प्रक्रियेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.






