Eknath Shinde | राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच मतभेद उफाळून येत असल्याचे चित्र समोर आले आहे. भाजप, शिवसेना युतीच्या मुद्द्यावरून पक्षातील वरिष्ठ नेते परस्परांच्या विरोधात उभे ठाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेनेही समाधानकारक कामगिरी केली असून कल्याण-डोंबिवली आणि ठाणे (Thane) हे आपले बालेकिल्ले त्यांनी कायम राखले आहेत. मात्र मुंबई महापालिकेत अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षासमोर नव्या आव्हानांची रांग लागली आहे. तरीही 29 जागा जिंकून मुंबईतील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याची संधी शिवसेनेला मिळाल्याचे मानले जात आहे.
धाराशिवमध्ये फुटीचे संकेत :
महापालिका निकालानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याआधीच धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. भाजप-शिवसेना युतीच्या धोरणावरून थेट शिवसेना नेत्यांमध्येच मतभेद समोर येत आहेत. धाराशिव येथे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी घेतलेल्या बैठकीकडे शिवसेना निरीक्षक राजन साळवी आणि पालकमंत्र्यांनी पाठ फिरवल्याची माहिती आहे.
एकीकडे मुंबईत पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी भाजप-शिवसेना युती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यात प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. आमदार तानाजी सावंत हे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी स्वतंत्र उमेदवार उभे करत असल्याची ठोस माहिती समोर आली असून, त्यामुळे पक्षातील मतभेद अधिक तीव्र झाले आहेत.
Eknath Shinde | युती कागदावरच राहणार? :
या घडामोडींमुळे शिवसेनेमध्येच युतीच्या मुद्द्यावरून दोन स्पष्ट गट पडल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबईतील धोरणात्मक घोषणा आणि धाराशिवमधील प्रत्यक्ष कृती यामध्ये मोठी तफावत दिसत असून, युती प्रत्यक्षात अस्तित्वात आहे की ती केवळ कागदावरच राहणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
धाराशिव जिल्ह्यात शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यातील राजकीय संघर्षामुळे स्थानिक राजकारण तापले आहे. या संघर्षाचा थेट परिणाम भाजप-शिवसेना युतीवर होण्याची शक्यता असून, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीला फटका बसू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ही युती टिकणार की तुटणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.






