Education System | भारतातील शिक्षण पद्धतीबद्दल (Education System) एक अत्यंत चिंतेची बाब समोर आली आहे. भारतातील अनेक विद्यार्थी इयत्ता पाचवीत पोहोचल्यानंतरही इयत्ता दुसरीच्या स्तरावरील धडा वाचू शकत नाहीत. अगदी साधे शब्द जसे की मानव, प्राणी आणि वनस्पती वाचण्यातही त्यांना अडचणी येत आहेत. ग्रामीण भारताची ही विदारक परिस्थिती ‘असर’च्या वार्षिक अहवालातून (ASER Annual Report) समोर आली आहे.
तिसरीतच शिक्षणाची घसरण-
इयत्ता दुसरीपर्यंत अनेक मुले वाचू, लिहू शकतात आणि अगदी साधी गणितंही सोडवू शकतात, परंतु इयत्ता तिसरीत गेल्यानंतर वाचन, लेखन आणि साधी गणिते करण्याची क्षमता कमी होते. ‘असर’ (ASER) २०२४ च्या अहवालानुसार, इयत्ता तिसरीतील फक्त २७ टक्के मुले अपेक्षित स्तरावर वाचू शकतात, तर फक्त २२ टक्के मुले साधी वजाबाकी करू शकतात.
मुले जसजशी मोठी होतात तसतशी ही समस्या कायम राहते. ६, ७ आणि ८ वर्षांची लहान मुले मूलभूत विषय शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी धडपडत आहेत. ‘असर’ अहवालात असे म्हटले आहे की, इयत्ता आठवीतील ४५ टक्के विद्यार्थी भागाकार करू शकत नाहीत, २३ टक्के विद्यार्थी वजाबाकी करू शकत नाहीत आणि २६ टक्के विद्यार्थी ११ ते ९९ मधील संख्यादेखील ओळखू शकत नाहीत. (Education System)
शिक्षणातील तफावत कायम-
‘असर’ २०२४ च्या आकडेवारीनुसार, ६ ते ८ वयोगटातील ७२ टक्के मुले सरकारी शाळांमध्ये दाखल आहेत. माध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) आणि मोफत पुस्तके , स्कूल बॅग आणि गणवेश यासारख्या सरकारी योजनांमुळे मुलांना शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळते. परंतु उपस्थिती वाढूनही, शिक्षणातील तफावत कायम आहे. केवळ उपस्थिती वाढवण्याऐवजी मुलांनी अधिक चांगल्या प्रकारे शिकणे आवश्यक आहे, हा अहवालातील प्रमुख निष्कर्षांपैकी एक आहे. भारताच्या २०११ च्या लोकसंख्या जनगणनेनुसार, ५ ते १४ वयोगटातील सुमारे १.२ कोटी मुलांना सक्तीने किंवा स्वेच्छेने बालमजुरी करावी लागते. यामुळे अभ्यासावरून लक्ष विचलित होते आणि शाळेतील उपस्थिती कमी होते. (Education System)
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) बेसिक एज्युकेशन काउन्सिलच्या सर्वेक्षणानुसार, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात, मुलांना शाळेत आकर्षित करण्यासाठी सर्व प्रयत्न करूनही, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) ६७ जिल्ह्यांतील सरकारी शाळांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नोंदवण्यात अपयश आले आहे.
विकसित भारत (Viksit Bharat) या सरकारच्या ध्येयाच्या अनुषंगाने, २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय असले तरी, १०० टक्के पटनोंदणी साध्य करण्यासाठी आणि सर्व मुलांना वाचता-लिहिता येण्यासाठी भारताला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
Title : Education System Only 50% Of Class 5 Students Can Read Class 2 Level Text ASER Report






