Dry Day in Maharashtra | महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक काळात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सलग चार दिवस ड्राय डे लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दारू पिणाऱ्या नागरिकांना १३ ते १६ जानेवारीदरम्यान मद्यापासून दूर राहावे लागणार आहे.
राज्यात सध्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महसूल विभाग आणि निवडणूक आयोगाने एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.
13 ते 16 जानेवारीदरम्यान दारू विक्री पूर्ण बंद :
राज्य शासनाच्या आदेशानुसार मंगळवार, १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका क्षेत्रात दारू विक्रीवर बंदी लागू होणार आहे. ही बंदी १४ जानेवारीचा संपूर्ण दिवस, १५ जानेवारीचा मतदानाचा दिवस आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे.
या कालावधीत राज्यातील सर्व दारूची दुकाने, बार, परमिट रूम आणि वाईन शॉप्स बंद राहणार आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
Dry Day in Maharashtra | 29 महापालिका क्षेत्रात कडक अंमलबजावणी :
हा ड्राय डे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये लागू असणार आहे. निवडणूक काळात कोणतीही दंगल, गैरप्रकार किंवा गोंधळ होऊ नये, यासाठी पोलीस आणि प्रशासनाचा बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. (Dry Day in Maharashtra)
निवडणूक आयोग आणि महसूल विभाग संयुक्तपणे या निर्णयाची अंमलबजावणी करणार असून दुकानदारांना याबाबत आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही नियमांचे पालन करून मतदानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे १३ ते १६ जानेवारीदरम्यान तळीरामांना तहान फक्त चकण्यावरच भागवावी लागणार आहे.






