Dharmendra | बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे.
कुटुंबीयांकडून खुलासा –
धर्मेंद्र (Dharmendra) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. मात्र, धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काळजी करण्यासारखे कोणतेही गंभीर कारण नाही. आरोग्याच्या काही समस्यांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, हे एक ‘रूटीन चेकअप’ असल्याचे सांगण्यात आले आहे.
धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२३ मध्येही त्यांची तब्येत बिघडली होती, त्यावेळी त्यांचा मुलगा सनी देओल त्यांना उपचारासाठी अमेरिकेला घेऊन गेला होता. वयोमानानुसार होणाऱ्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळीही त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी ही नियमित तपासणी असल्याचे सांगितले होते.
चित्रपटसृष्टीत आजही सक्रिय
वयाची ८० ओलांडली असली तरी धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत आजही सक्रिय आहेत. लवकरच ते श्रीराम राघवन दिग्दर्शित आणि अगस्त्य नंदा अभिनित ‘इक्कीस’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले असून, ‘फूल और पत्थर’ , ‘चुपके चुपके’ , ‘शोले’ आणि ‘धरम वीर’ (यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा त्यात समावेश आहे.
धर्मेंद्र सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात. ते इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात आणि जुन्या आठवणी व चित्रपटांशी संबंधित किस्से शेअर करत असतात. अगदी अलीकडेच, त्यांनी ‘इक्कीस’ चित्रपटाचा ट्रेलरही आपल्या अकाऊंटवरून पोस्ट केला होता, ज्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता.






