Dhananjay Munde | माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याबद्दल तब्येतीच्या खोट्या बातम्यांनी राज्यभरात संभ्रम निर्माण केला होता. मात्र, आता स्वत: मुंडे यांनी ट्विट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून, अर्धांगवायू नव्हे तर जुना आजार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे यांना (Bell’s Palsy) बेल्स पाल्सीचा त्रास झाल्याचं त्यांनीच स्पष्ट केलं आहे. काही माध्यमांनी (Babasaheb Patil) बाबासाहेब पाटील यांच्या विधानावर आधारित चुकीचे वृत्त देत त्यांना अर्धांगवायू झाल्याचे सांगितले होते. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता आणि संभ्रम वाढला होता. मात्र, मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगितले की, दीड महिन्यांपूर्वी त्यांना बेल्स पाल्सी झाला होता आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्यामुळे अजूनही बोलायला त्रास होतो आहे. त्यांनी नमूद केलं की, “मला कोणताही नवा आजार झालेला नाही.”
या आजाराचा परिणाम चेहऱ्यावर होतो आणि बोलण्यात अडचणी निर्माण होतात. बाबासाहेब पाटील यांच्याशी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीचा उल्लेख करत मुंडे यांनी त्यांची चिंता आणि सद्भावना मान्य करत, आपल्याला अर्धांगवायूचा झाला नसल्याचे ठामपणे सांगितले.
नामदेव शास्त्रींच्या विधानामुळे चर्चेला उधाण
(Pimpalner) पिंपळनेर येथे झालेल्या नारळी सप्ताह कार्यक्रमात धनंजय मुंडे हजर राहू शकले नव्हते. यावेळी महंत (Namdev Shastri) नामदेव शास्त्री यांनी त्यांच्या अनुपस्थितीमुळे चिंता व्यक्त करत सांगितले की, “धनंजय मुंडे यांची वाणी गेली आहे, त्यांच्या गालावरून वारं गेलं आहे.” यामुळे अर्धांगवायूची चर्चा महाराष्ट्रभर पसरली. समर्थकांनी सोशल मीडियावरून त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
मात्र, धनंजय मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यांनी सर्वांना खात्री दिली आहे की, त्यांना झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने त्यांना कोणताही आजार झालेला नाही.
Title : Dhananjay Munde Clarifies Health Rumors Himself






