Delhi Blast | दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या भीषण स्फोटानंतर (Delhi Blast) संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत आणि देशभरात सतत छापेमारी सुरू आहे. तपासादरम्यान अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यापैकी सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे डॉ. शाहिना शाहिद (Dr. Shaheena Shahid).
फरिदाबाद येथून अटक करण्यात आलेली डॉ. शाहिना शाहिद (Dr. Shaheena Shahid) ही जैश-ए-मोहम्मदच्या महिला कमांडची प्रमुख असल्याचं उघड झालं आहे. चौकशीत तिने जे काही सांगितलं आहे, त्यानं सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. शाहीनानं कबूल केलं की ती आणि तिचे साथीदार गेल्या दोन वर्षांपासून भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होते.
जैश-ए-मोहम्मदच्या आदेशावर सुरू होतं गुप्त ऑपरेशन :
मिळालेल्या माहितीनुसार, शाहीनानं चौकशीत सांगितलं की तिच्या संपूर्ण कारवाया या जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर सुरू होत्या. ती, डॉ. उमर, मुझम्मिल आणि आदिल या साथीदारांसह गेल्या दोन वर्षांपासून अमोनियम नायट्रेटसारख्या स्फोटक पदार्थांचा साठा करत होती. प्रत्येक पावलामागे पाकिस्तानातील हँडलर्सकडून स्पष्ट सूचना मिळत असल्याचंही शाहीनानं सांगितलं.
तपास अधिकार्यांच्या माहितीनुसार, डॉ. उमर (Dr. Umar) हा या संपूर्ण योजनेचा ‘ऑपरेशन हेड’ होता. तो नियमितपणे शाहीनाशी संपर्कात राहून भारतातील मोठ्या शहरांमध्ये स्फोट घडवण्याची योजना आखत होता. शाहीनाचं म्हणणं आहे की, उमरकडून तिला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन मिळत होतं.
Delhi Blast | लाल किल्ला स्फोटातील कार आणि आरोपींचं नातं स्पष्ट :
सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात वापरल्या गेलेल्या पांढऱ्या रंगाच्या आय-20 कारचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये काळा मास्क घातलेला व्यक्ती दिसत असून त्याची ओळख काश्मीरचा रहिवासी डॉ. उमर नबी अशी पटली आहे. स्फोटानंतर दिल्ली, फरिदाबाद, आणि जम्मू-काश्मीरमध्ये एकाच वेळी छापेमारी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठावरही तपास यंत्रणांनी धाड टाकली असून सात डॉक्टर आणि एकूण तेरा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या सर्वांचा या हल्ल्याशी थेट संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
चौकशीत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता :
सध्या शाहीनाची कसून चौकशी सुरू असून, तपास अधिकार्यांना या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येईल, असा अंदाज आहे. या हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असलेल्या गटांचा हात असल्याचंही प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. (Dr. Shaheena Shahid Statement)
या घटनेमुळे देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून प्रमुख शहरांमध्ये उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या हल्ल्याचा उद्देश फक्त भीती पसरवण्याचा नसून भारताच्या सुरक्षिततेला हादरा देण्याचा होता, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.






