Pune Rape l शिरूर (Shirur) तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असलेला दत्तात्रय रामदास गाडे (Dattatray Ramdas Gade) हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर शिरूर, शिक्रापूरसह अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये जबरी लुटीचे सहा गुन्हे दाखल आहेत. वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकीत बसवून त्यांना लुबाडण्याचा त्याचा धंदा होता.
शिरूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये दत्तात्रय गाडे याने कर्ज काढून एक चारचाकी कार विकत घेतली होती. पुणे-अहमदनगर मार्गावर प्रवासी वाहतूक करत, तो वृद्ध महिलांना हेरायचा. अंगावर जास्त दागिने असलेल्या एकट्या-दुकट्या वृद्ध महिलांना तो लिफ्ट द्यायचा. ‘जेवणाचा डबा घ्यायचा आहे’ किंवा ‘जवळच्या मार्गाने जाऊ’, असे सांगून, निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत दागिने काढून घेत आणि पलायन करत असे.
पुणे (Pune) पोलिसांकडून अटक :
अशाप्रकारे महिलांना लुबाडत असताना, एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले आणि सुमारे १२ तोळे सोने जप्त केले. गाडे याची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. गावात त्याचे पक्क्या बांधकामातील पत्र्याचे छत असलेले घर आहे आणि वडिलोपार्जित तीन एकर शेतजमीन आहे. तो काहीही कामधंदा न करता टारगट मुलांसोबत फिरत असतो आणि त्यातूनच त्याने हे गुन्हे केले.
Pune Rape l मोठ्या पुढाऱ्याचा कार्यकर्ता :
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय गाडे हा एका मोठ्या पुढाऱ्याचा कार्यकर्ता म्हणून काम करत होता. त्याचे त्या पुढाऱ्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गुणाट गावच्या तंटामुक्त समितीत सदस्य पदासाठीच्या निवडणुकीत तो उभा होता, परंतु त्यात त्याचा पराभव झाला. दत्तात्रय गाडे याचा नेहमी बसस्थानकावर वावर असायचा. त्याचे राहणीमान इनशर्ट, स्पोर्टस शूज, मास्क असे होते. तो बसस्थानकावरील लोकांना पोलिस असल्याचे भासवायचा. मंगळवारी (दि. २५) दत्तात्रयने केलेल्या कृत्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील तो फॉर्मल शर्ट, पॅण्ट आणि शूज याच वेशात होता. त्याने पीडितेशी संवाद साधताना स्वतःची ओळख पोलिस म्हणून करून दिल्याची माहिती मिळाली.
शिक्षा भोगली, खटले प्रलंबित :
२०२० मध्ये शिरूरजवळील कर्डे घाटात दत्तात्रय गाडेने लुटमार केली होती. त्या प्रकरणी त्याच्यावर जबरी लूट, दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातच तीन-चार वर्षांपूर्वी त्याला पाच-सहा महिन्यांची शिक्षा झाली आहे. शिक्रापूर येथे दोन, अहमदनगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव व कोतवाली पोलिस ठाण्यांत प्रत्येकी एक असे गुन्हे दाखल आहेत. इतर गुन्ह्यांतील खटले प्रलंबित असल्याने तो मोकाट फिरत होता.






