IMD Alert | देशातील हवामान अचानक बदलत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मोठा इशारा जारी केला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीची चाहूल लागत असतानाच आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट डोकं वर काढत आहे. ‘हिटवाह’ (Cyclone Hitwah) या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये हवामानाचा मोठा उलटफेर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी देशभरात गंभीर हवामानस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे IMD ने स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून काही राज्यांमध्ये दाट धुके आणि गारठा जाणवत असताना आता पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत आणि बंगालच्या उपसागरावर हे चक्रीवादळ सध्या सक्रिय अवस्थेत असून पुढील 24 ते 48 तासांत ते भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 28 नोव्हेंबरच्या दुपारी हे चक्रीवादळ त्रिंकोमालीपासून 30 किमी नैऋत्येस असल्याचे IMD ने सांगितले.
तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा हल्ला :
या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशावर होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 29 आणि 30 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त झाली आहे. तसेच 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत आंध्र प्रदेश आणि रायलसीमा किनारपट्टी भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा लागू राहणार आहे. यासोबतच जोरदार वाऱ्यांची शक्यता असून समुद्रात खवळलेली परिस्थिती निर्माण होऊ शकते.
दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये आधीच ढगाळ वातावरणासह वाऱ्याचा वेग वाढलेला दिसत आहे. श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून 4 किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्येकडे सरकणाऱ्या या वादळाचा प्रभाव वाढत चालल्याचे IMD च्या नव्या अपडेटमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील परिस्थितीही या चक्रीवादळामुळे अधिक अस्थिर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
IMD Alert | महाराष्ट्रात गारठा वाढणार; विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज :
चक्रीवादळाचा (Cyclone Hitwah) थेट परिणाम महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात नसेल, मात्र हवामानात बदल निश्चितपणे जाणवणार आहे. राज्यात 2 ते 3 डिसेंबरपर्यंत थंडीचा इशारा जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन-चार दिवसांपासून मुंबईसह अनेक शहरांमध्ये गारठा वाढलेला आहे. 28 नोव्हेंबर रोजी भंडाऱ्यात राज्यातील सर्वात कमी 10 अंश तापमानाची नोंद झाली. (IMD Alert)
विदर्भातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच कोकण किनारपट्टीवरही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडी आणि पावसाची सरमिसळ झाल्याने नागरिकांना वातावरणातील बदल जाणवू लागला आहे. त्यामुळे 29 आणि 30 नोव्हेंबरचे दिवस अनेक राज्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.






