Ahilyanagar | अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला गावात आज सकाळी दुर्गा माता मिरवणुकीदरम्यान दोन समाजगटांमध्ये निर्माण झालेल्या वादाने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या घटनेत काही आंदोलक जखमी झाले असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (Ahilyanagar crime news)
विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न :
कोटला गावात गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे (Shivpratisthan Hindustan) दरवर्षी दुर्गा माता मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढली जाते. आज सकाळीही उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक मोठ्या थाटामाटात सुरू झाली. मात्र, मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी कृती केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका संशयिताने रस्त्यावर एका धर्मगुरूंचे नाव लिहून त्याची विटंबना केली. हा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच एका समाजगटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तात्काळ कारवाईची मागणी केली.
Ahilyanagar | आंदोलन आणि पोलिसांचा लाठीचार्ज :
या घटनेनंतर संतप्त झालेल्या गटाने कोटला गावातील मुख्य रस्त्यावर एकत्र येत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. मागील काही तासांपासून हे आंदोलन सुरू असल्याने गावातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना शांततेने रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. तथापि, आंदोलकांनी जागेवरून हलण्यास नकार दिला आणि आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अखेर सौम्य लाठीचार्जचा अवलंब करावा लागला. या कारवाईदरम्यान काही आंदोलक जखमी झाले, तर काहींनी पोलिसांवर प्रतिहल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत मिरवणुकीदरम्यान भावना दुखावणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तरीही, आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.






