Chhaava l विकी कौशल (Vicky Kaushal), अक्षय खन्ना (Akshay Khanna) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ (Chhaava Movie) चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र, काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आल्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला.
या प्रकरणी ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ‘शिवतीर्थावर’ भेट घेतली.
छत्रपती संभाजी महाराजांवर (Chhatrapati Sambhaji Maharaj) आधारित असलेला ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे. परंतु, प्रदर्शनापूर्वीच वादात सापडल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशातच आता यावर तोडगा काढण्यासाठी दिग्दर्शकांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतली आहे.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर लक्ष्मण उतेकरांची प्रतिक्रिया :
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले की, “आज राज ठाकरेंची भेट त्यांचा सल्ला घेण्यासाठी होती. त्यांच वाचन दांडगं आहे, त्यांना इतिहास (History) ज्ञात आहे. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरही (Chhatrapati Shivaji Maharaj) खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात नेमका काय बदल करावा? हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. आणि याच चर्चेतून त्यांनी मला काही सूचना केल्यात. ते बदल आम्ही करणार आहोत. तसेच, ज्या दृश्यांवरून वाद सुरू आहे, ते आम्ही डिलीट (Delete) करणार आहोत. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.”
Chhaava l ‘छावा’मधील ‘त्या’ दृश्यावर आक्षेप :
‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यात अभिनेता विकी कौशल लेझीम (Lezim) खेळताना दिसत आहे. हा सीन सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या दृश्यावर आक्षेप घेतला, यामध्ये काही राजकीय नेत्यांचाही समावेश होता. लेझीमचे हे दृश्य हटवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका काहींनी घेतली होती. त्यानंतर आता दिग्दर्शक राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
नेटकऱ्यांमध्ये दोन गट :
‘छावा’ चित्रपटातील लेझीमच्या दृश्यावरून सध्या नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. एका गटाचे म्हणणे आहे की, हे दृश्य अजिबात आक्षेपार्ह वाटत नाही. महाराजांची कीर्ती सर्वत्र चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचत असेल तर त्यात आक्षेप का घ्यावा? तर, दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला अशा पद्धतीने लेझीम खेळताना दाखवू नये.








