Budget 2026 | केंद्रीय अर्थसंकल्प 2026 येत्या रविवारी, 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण याकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदा कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचं संकेत असून, कृषी बजेट थेट 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या विविध योजनांना मोठा फायदा होणार आहे.
आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये कृषीसाठी केवळ 21,933 कोटी रुपये इतकी तरतूद होती, ती गेल्या वर्षी 1.27 लाख कोटींपर्यंत वाढली आहे. यंदा त्यात आणखी वाढ होऊन कृषी बजेट दीड लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील गुंतवणूक, उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पीएम किसान, पीक विमा आणि सिंचन योजनांना मोठा निधी :
तज्ज्ञांच्या मते, पीएम किसान योजना, पंतप्रधान पीक विमा योजना आणि पीएम कृषी सिंचन योजनेसाठी यंदाच्या बजेटमध्ये अधिक निधीची तरतूद होऊ शकते. विशेषतः पीएम किसान योजनेचा हप्ता सध्याच्या 2,000 रुपयांवरून थेट 4,000 रुपये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक आधार मिळू शकतो. (PM Kisan scheme)
कृषी बजेटमध्ये वाढ झाल्यास शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांना अधिक बळ मिळेल. सिंचन सुविधा विस्तार, पीक संरक्षण, विमा कवच आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या उपाययोजनांना याचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे.
Budget 2026 | नवीन बियाणे कायदा आणि कृषी निर्यातीला चालना
कृषी मंत्र्यांच्या माहितीनुसार, या बजेट सत्रात नवीन बियाणे बिल सादर होण्याची शक्यता आहे. या कायद्यानुसार बनावट आणि निकृष्ट बियाण्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी, उत्पादक आणि विक्रेत्यांवर 30 लाख रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सध्या भारताची वार्षिक कृषी व अन्नधान्य निर्यात सुमारे 50 ते 55 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. मात्र, व्यापार अडचणी आणि टॅरिफ वादांमुळे उद्दिष्टपूर्तीवर परिणाम होत आहे. आगामी बजेटमध्ये निर्यात सुविधा, तात्काळ मंजुरी प्रक्रिया आणि मूल्यवर्धित कृषी उत्पादनांसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाऊ शकतो. त्यामुळे नवीन बाजारपेठा खुल्या होऊन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.






