Board Exam Centers New Rules | राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने मोठे आणि कठोर पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. परीक्षांदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे, स्थिर पथके आणि भरारी पथके असूनही अनेक केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघड झाल्यामुळे आता परीक्षा केंद्रांच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा विचार सुरू आहे.
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education कडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काळात केवळ पुरेशा सुविधा असलेल्या आणि किमान 500 विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था असलेल्या शाळांनाच परीक्षा केंद्र म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागातील केंद्रांवर सर्वाधिक गैरप्रकार :
राज्य मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदाच्या परीक्षांदरम्यान मोठ्या प्रमाणात गैरप्रकार समोर आले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार अधिक नोंदवले गेले. त्यामुळे आता अनेक ग्रामीण परीक्षा केंद्रांची संख्या कमी करण्याची तयारी मंडळाने सुरू केली आहे.
सध्या राज्यात एकूण नऊ विभागांत परीक्षा घेतल्या जातात. त्यात Pune, Mumbai, Nashik, Kolhapur, Amravati, Latur, Chhatrapati Sambhajinagar, Konkan Division आणि अहिल्यानगर विभागांचा समावेश आहे. यापैकी कोकण विभाग वगळता इतर आठ विभागांमध्ये बारावीच्या परीक्षेत तब्बल 237 कॉपीचे प्रकार नोंदवले गेले आहेत. तर दहावीच्या परीक्षेत 74 केंद्रांवर गैरप्रकार उघडकीस आले.
अमरावती, पुणे, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागांमध्ये सर्वाधिक गैरप्रकार आढळल्याचेही समोर आले आहे.
Board Exam Centers New Rules | परीक्षा केंद्रांची थेट पडताळणी होणार :
परीक्षा सुरू होण्यापूर्वी जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रांची तपासणी करून अहवाल दिला होता. मात्र प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान घडलेल्या घटनांमुळे अनेक ठिकाणी वास्तव परिस्थिती वेगळी असल्याचे स्पष्ट झाले. (SSC HSC Exam Copy Cases)
यामुळे आता राज्यातील सुमारे साडेपाच हजार परीक्षा केंद्रांची तपासणी थेट मंडळाचे अधिकारी आणि विशेष पथके करणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, कंपाऊंड भिंत, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि इतर आवश्यक व्यवस्था नसलेल्या शाळांची परीक्षा केंद्र म्हणून मान्यता रद्द करण्याचा विचार सुरू आहे.
तसेच शहरी भागात केंद्रे असतील तर पोलीस बंदोबस्त आणि भरारी पथकांची तपासणी अधिक प्रभावीपणे करता येते. त्यामुळे भविष्यात शक्यतो तालुक्याच्या मुख्य ठिकाणी किंवा शहरी भागातच अधिक परीक्षा केंद्रे ठेवण्याचा प्रस्ताव आहे. (Board Exam Centers New Rules)
यंदाच्या परीक्षांमध्ये एकूण 318 गैरप्रकार नोंदवले गेले असून त्यात दहावीतील 74, बारावीतील 237 आणि सामूहिक कॉपीची 7 प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे पुढील वर्षांपासून कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी मंडळ अधिक कडक उपाययोजना करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.






