Tejaswi Ghosalkar Wealth | मुंबई महापालिका निवडणूक 2026 सध्या केवळ राजकीय संघर्षापुरती मर्यादित न राहता उमेदवारांच्या अफाट संपत्तीमुळेही चर्चेत आली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी आपले बलाढ्य आणि धनाढ्य उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तब्बल 227 वॉर्डमध्ये सुमारे 1700 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, अनेक उमेदवार कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे काही उमेदवारांची संपत्ती गेल्या काही वर्षांत लाखांवरून थेट कोटींवर पोहोचल्याचे आकडे समोर आले आहेत. यामुळे महापालिका निवडणूक ही केवळ लोकप्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया न राहता आर्थिक ताकदीचे प्रदर्शन बनल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
माजी महापौर आणि दिग्गज नेत्यांची कोट्यवधींची संपत्ती :
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) वॉर्ड क्रमांक 199 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे सध्या 5 कोटी 26 लाख रुपयांची मालमत्ता आहे. 2017 मध्ये ही मालमत्ता 1 कोटी 61 लाख होती, म्हणजेच अवघ्या काही वर्षांत त्यांच्या संपत्तीत 3 कोटी 65 लाखांची वाढ झाली आहे.
त्याचप्रमाणे ठाकरे गटाच्या माजी महापौर श्रद्धा जाधव (Shraddha Jadhav) या वॉर्ड क्रमांक 202 मधून निवडणूक लढवत असून त्यांची एकूण मालमत्ता तब्बल 46 कोटी रुपये इतकी आहे. 2024 च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 2 कोटींची वाढ झाली आहे. माजी महापौर विशाखा राऊत यांची मालमत्ता देखील 7 कोटींनी वाढून आता 21 कोटी 83 लाख रुपयांवर पोहोचली आहे.
Tejaswi Ghosalkar Wealth | तेजस्वी घोसाळकरांची झपाट्याने वाढलेली संपत्ती :
मुंबई महापालिका निवडणुकीतील (Mumbai Mahapalika) सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे तेजस्वी घोसाळकर (Tejaswi Ghosalkar Wealth). ठाकरे गटातून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या तेजस्वी अभिषेक घोसाळकर वॉर्ड क्रमांक 2 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सध्या एकूण 5 कोटी रुपयांची संपत्ती आहे. विशेष बाब म्हणजे 2017 मध्ये त्यांची मालमत्ता केवळ 25 लाख रुपये इतकी होती. अवघ्या आठ वर्षांत त्यांच्या संपत्तीत 4 कोटी 75 लाखांची वाढ झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून समाधान सरवणकर यांचे नाव समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांची संपत्ती 2017 मध्ये 9 कोटी 43 लाख होती, ती आता थेट 46 कोटी 59 लाख रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच त्यांच्या संपत्तीत तब्बल 37 कोटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे. भाजपचे नील किरीट सोमय्या आणि रवी राजा यांच्याही संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे. (Richest Candidates Mumbai)
मुंबई महापालिका निवडणूक 2026 मध्ये उमेदवारांच्या वाढत्या संपत्तीमुळे राजकारणातील पैशाची भूमिका पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या निवडणुकीत मतदार कोणाला पसंती देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






