Amit Thackeray | महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच सोलापुरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या झाली होती. या घटनेनंतर सोलापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटताना दिसत आहेत.
या हत्येनंतर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सोलापुरात (Solapur) जाऊन सरवदे कुटुंबीयांची भेट घेतली होती. कुटुंबियांचे दुःख जवळून पाहिल्यानंतर अमित ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना एक भावनिक आणि स्पष्ट शब्दांत पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी सरकारसमोर तीन महत्त्वाच्या मागण्या मांडत सत्तेच्या राजकारणावरही तीव्र भाषेत प्रश्न उपस्थित केले आहेत.
“सत्तेसाठी घर उद्ध्वस्त होणं ही कोणती संस्कृती?” – अमित ठाकरे :
अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आपल्या पत्रात सोलापुरात घडलेली घटना आजही अविश्वसनीय असल्याचे नमूद केले आहे. बाळासाहेब सरवदे यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, त्यामुळे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकते, यावर विश्वास बसत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सरवदे यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर दोन लहान मुलींचा आक्रोश, त्यांचे दु:ख आणि कुटुंबावर कोसळलेले संकट पाहून मन सुन्न झाल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
“निवडणुका येत राहतील, पण सत्तेसाठी कोणाचं घर उद्ध्वस्त व्हावं का?” असा थेट सवाल उपस्थित करत हा कोणता महाराष्ट्र घडतो आहे, अशी खंत अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ही लढाई राजकारणाची नसून माणुसकी आणि न्यायाची असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले आहे.
Amit Thackeray | अमित ठाकरेंच्या मागण्या :
या पत्राद्वारे अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्याकडे तीन ठोस मागण्या मांडल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे बाळासाहेब सरवदे यांच्या दोन्ही मुलींच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी. कुटुंबाचा कर्ता व्यक्ती गमावल्याने निर्माण झालेला आधार शासनाने उभा करावा, ही राज्याच्या प्रमुखाची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Solapur Murder Case)
दुसरी मागणी म्हणजे या हत्येतील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी. ही शिक्षा केवळ कायदेशीर प्रक्रिया न राहता त्या कुटुंबाला मिळणारा खरा न्याय ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे निवडणुकीच्या काळातील प्रचार आणि राजकीय वाद हिंसक वळण घेऊ नयेत, यासाठी निवडणूक आचारसंहितेत कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी.






