Uddhav Thackeray | राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. अशा पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंगचे सत्र वेगात सुरू आहे. (Uddhav Thackeray News)
नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही पक्ष सोडण्यात आल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे.
शिंदे गटातील सहसंपर्क प्रमुख ठाकरे गटात दाखल :
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख दादा पवार (dada Pawar) यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटात खळबळ उडाली असून ठाकरे गटासाठी ही मोठी राजकीय ताकद मानली जात आहे.
ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. पक्षात प्रवेश केल्यानंतर दादा पवार यांना भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीआधीच शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
Uddhav Thackeray | “स्वगृही परतल्यासारखं वाटतं” – दादा पवार :
पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना दादा पवार म्हणाले की, “शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर मला घरी आल्यासारखं वाटत आहे.” शिंदे गटात जाताना जी आश्वासनं देण्यात आली होती, त्यापैकी एकही पूर्ण झाली नाही, असा आरोप त्यांनी केला.
“म्हणूनच आम्ही पुन्हा स्वगृही परतलो आहोत. आता आयुष्यभर शिवसेना ठाकरे गट सोडणार नाही,” असे स्पष्ट करत दादा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. या घडामोडीमुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र दिसत आहे.






